नागपुरात तापमानाचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पारा 46.2 अंशांवर, ब्रह्मपुरी विदर्भात पुन्हा "हॉट'
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून, नागपूरकरांसाठी सोमवारचा दिवस या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण ठरला. तर, ब्रह्मपुरी येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने मंगळवारीदेखील विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिला आहे.

पारा 46.2 अंशांवर, ब्रह्मपुरी विदर्भात पुन्हा "हॉट'
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेने रौद्र रूप धारण केले असून, नागपूरकरांसाठी सोमवारचा दिवस या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण ठरला. तर, ब्रह्मपुरी येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने मंगळवारीदेखील विदर्भात उन्हाच्या लाटेचा इशारा दिला आहे.

विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. उन्हाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना विशेषत: नागपूर आणि ब्रह्मपुरीला बसतो आहे. सोमवारी कमाल तापमानाने नागपुरात 46.2 अंश सेल्सिअसचा नवा उच्चांक गाठला. या उन्हाळ्यात पारा पहिल्यांदाच 46 डिग्री पार गेला. मोसमातील यापूर्वीचा उच्चांक 45.5 अशं सेल्सिअस इतका होता, जो 18 एप्रिलला नोंदविण्यात आला होता. उन्हाचा तडाखा लक्षात घेता दशकातील व सार्वकालिक विक्रम मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 2013 मध्ये नागपूरचे तापमान विक्रमी 47.9 अंशांवर गेले होते.

ब्रह्मपुरीवासींसाठी सोमवारचा दिवसही परीक्षा घेणारा ठरला. येथे आजही विदर्भात सर्वाधिक (46.5 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद करण्यात आली. याशिवाय वर्धा (45.5 अंश सेल्सिअस), गोंदिया (45.2 अंश सेल्सिअस), चंद्रपूर (45.0 अंश सेल्सिअस) आणि अकोला (44.9 अंश सेल्सिअस) येथे उष्णलाटेचा अधिक प्रभाव दिसून आला.

संकेतस्थळ अजूनही बंदच
गेल्या आठ-नऊ दिवसांपासून बंद असलेले प्रादेशिक हवामान विभागाचे संकेतस्थळ अजूनही दुरुस्त झाले नाही. ऐन उन्हाळ्यात संकेतस्थळ बंद पडल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांसह प्रसारमाध्यमांचीही मोठी अडचण होत आहे. दैनंदिन तापमान व हवामानाविषयीचे अंदाज मिळविण्यापासून ते कित्येक दिवसांपासून वंचित आहेत.

संकेतस्थळातील तांत्रिक बिघाड दुरुस्त व्हायला आणखी काही दिवस लागणार असल्याचे अधिकारी सांगतात. सात मे रोजी हवामान विभागाचे संकेतस्थळ कुणीतरी "हॅक' केले होते. संकेतस्थळाचे संचालन करणारे "नागपूर इन्फॉर्मेटिक्‍स सेंटर'चे(एनआयसी) तज्ज्ञ सध्या सायबर टीमच्या मदतीने तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विदर्भातील तापमान अंश सेल्सिअसमध्ये
नागपूर 46.2
अकोला 44.9
अमरावती 43.0
बुलडाणा 41.0
ब्रह्मपुरी 46.5
चंद्रपूर 45.0
गोंदिया 45.2
वर्धा 45.5
वाशीम 42.6
यवतमाळ 44.5

Web Title: temperature record in nagpur