गडचिरोलीतील सीआरपीएफच्या दहा कंपन्या काश्‍मिरात

file photo
file photo

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आणलेल्या केंद्रीय पोलिस दलाच्या 10 कंपन्या इथून हटवून काश्‍मीरमध्ये पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षांपासून नियमित नक्षली कारवाया होत असून अलीकडेच महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलिस शहीद झाले होते. त्यानंतर नित्यनेमाने हिंसक घटना सुरूच आहेत. या जिल्ह्यातील आणि एकूणच दंडकारण्यातील नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी पहिल्या यूपीए सरकारने इथे निमलष्करी दल तैनात केले. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतही ही दले तैनात करण्यात आली. त्यामुळे नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना मोठे यश आले. गडचिरोली जिल्ह्यातही केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पाच बटालियन कार्यरत होत्या. या प्रत्येक बटालीयनमध्ये सात कंपन्यांचा समावेश असतो. एका कंपनीत 135 जवान असतात. त्यापैकी 10 कंपन्या म्हणजेच 1 हजार 350 जवान येथून काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
370 कलम हटविल्यानंतर आणि अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांची धमकी मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 10 कंपनी काश्‍मीरला पाठवण्यात आल्या. आता काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आहे. सोबतच नियमित सुरक्षा व्यवस्था सांभाळायची आहे. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध सुरक्षा यंत्रणेवर मोठा ताण येऊ शकतो. मात्र, अतिरिक्त बटालियन केवळ निवडणुकीपुरत्या बोलावल्या जातील. पण कमी केलेल्या 10 कंपनी पुन्हा कायम केल्या जातील, हे अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे राज्य पोलिसांवरील ताण वाढण्याची मोठी शक्‍यता आहे.
``केंद्रीय पोलिस दलाच्या कंपन्या इतरत्र हलविल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षेवर कुठलाही फरक पडणार नाही. आमच्याकडे
पुरेशी यंत्रणा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बटालियन मागवल्या जातील.``
मानस रंजन,
पोलिस महानिरीक्षक, सीआरपीएफ गडचिरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com