दर्गा हटविताना लाठीचार्ज, तणाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

नागपूर : गेली अनेक वर्षे रस्त्यावर असलेला सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चौकातील दर्गा हटविण्याच्या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध करीत महापालिकेच्या पथकाला रोखून धरले. कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांना शिविगाळ करणे सुरू केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत दर्गा हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

आज दुपारी गांधीबाग उद्यानापुढील कालीमाता मंदिर हटविण्यासाठी महापालिकेचे पथक पोहोचले. मोठा पोलिस ताफा व अधिकाऱ्यांसह पोहोचलेल्या पथकाला येथील नागरिक, व्यापाऱ्यांनी विरोध केला. मात्र, यावेळी काही नागरिकांची समजूत काढण्यात आली तर तीव्र विरोध करणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी अतिक्रमण विरोधी पथकाचा मार्ग मोकळा केला. काही नागरिकांनी पूजेसह येथील मूर्ती काढली. त्यानंतर मंदिराच्या भिंती बुलडोजरच्या मदतीने पाडण्यात आल्या. येथून पथकाने अग्रसेन चौकातील दर्गाकडे आगेकूच केली. तीन जेसीबी, दोन पोकलॅंडसह पथक पोहोचताच नागरिकांनी विरोध केला. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आक्रमकपणे अधिकाऱ्यांशी वाद घातला. काहींनी अधिकाऱ्यांना शिविगाळ केली. पोलिसांनी सौहार्दपूर्ण वातावरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोध वाढतच गेला. संतप्त झालेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना शिविगाळ करीत अंगावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईने चांगलीच धावपळ झाली. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोध करणाऱ्या नागरिकांनीही पळ काढला. अखेर गर्दी कमी झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कारवाईस प्रारंभ केला. सर्वप्रथम दर्गातील सर्व धार्मिक साहित्य सन्मानाने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दर्गा पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. ही कारवाई रात्री साडेआठनंतरही सुरू होती. दोन्ही कारवाईत महापालिका अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे यांच्यासह तहसिल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांनी मोठ्या पोलिस ताफ्यासह भाग घेतला.
वाहतूक कोंडी
कारवाईदरम्यान चिटणीस पार्ककडून इंदोराकडे जाणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. दर्गा हटविण्याच्या कारवाईत तणाव निर्माण झाल्याने हा रस्ता काही वेळासाठी बंद झाला. परिणामी या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Web Title: tension while removing dargah