टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त;प्राथमिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्‍यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

अमरावती - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. वर्ष 2019 ची 30 जून ही अंतिम मुदत असून तोपर्यंत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. याचा फटका शेकडो शिक्षकांना बसण्याची शक्‍यता आहे. 

अमरावती - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. वर्ष 2019 ची 30 जून ही अंतिम मुदत असून तोपर्यंत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. याचा फटका शेकडो शिक्षकांना बसण्याची शक्‍यता आहे. 

13 फेब्रुवारी 2013 नंतर खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षकपदावर नियुक्त झालेल्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांनी अद्याप शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही त्यांना 30 जून 2016 पासून पुढील तीन वर्षे मुदत दिल्या गेली आहे. त्यामुळे या शिक्षकांना जून 2019 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे, अन्यथा त्यांची नोकरी जाण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकपदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयान्वये बंधनकारक आहे. तथापि पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सहसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक (पश्‍चिम, उत्तर दक्षिण) मुंबई व मनपा शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी यांना 10 ऑगस्टला पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत. राज्यात टीईटी न झालेल्या शिक्षकांची संख्या सात हजारांच्या जवळपास आहे. वर्ष 2010 पासून या परीक्षा अनिवार्य करण्यात आल्या. त्यानंतर काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्याने मुदतवाढ दिल्या गेली. वर्ष 2013 मध्ये पुन्हा आदेश काढून परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केल्या गेले. त्यावेळीही मुदतवाढ दिल्या गेली. मात्र, बऱ्याच शिक्षकांनी ते गांभीर्याने न घेतल्याने आता 2016 पासून तीन वर्षांची अखेरची मुदत दिल्या गेली. या आदेशानंतर दोन वेळा परीक्षा झाल्या असून जुलै 2018 मधील टीईटी परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांसह अखेरच्या संधीत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांची सेवा वाचू शकणार आहे.

Web Title: Termination of service if not passed TET primary teachers jobs