Forest : अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे! वन्य प्राण्यांची पाण्यासाठी लोकवस्तीत भटकंती | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Animal

Forest : अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे! वन्य प्राण्यांची पाण्यासाठी लोकवस्तीत भटकंती

बुलडाणा : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात विविध प्रजातीचे प्राणी पक्षी यांचा अधिवास आहे. या अभयारण्यातील कृत्रिम पाणीपुरवठा कोडे पडत चालल्याने वन्य प्राण्यांना आता पाण्यासाठी लोकवस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे.

मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी होते. त्यामुळे अभयारण्यात नैसर्गिक आणि कृत्रिम पानवठे यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची पाण्याची सोय होईल अशी अपेक्षा होती.

मात्र गत पंधरा दिवसात जिल्ह्याचे तापमान ४१ अंशआपर्यंत वाढल्याने या पानवठ्यातील पाणी आता आटायला लागले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध कमी प्रमाणात होत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

चार तालुक्यात विस्तार असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची बुलडाणा व खामगाव अशी विभागणी करण्यात आली आहे. बुलडाणा रेंजमध्ये ४ राउंड ९ बीट आहे तर खामगाव रेंजमध्ये ३ राउंड ११ बीट आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असलेल्या या अभयारण्यात विविध प्रजातीचे प्राणी पक्षी यांचा अधिवास आहे. मात्र सध्या जंगलातील पाणी संपत असल्याने वन्य प्राण्यांना पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागत आहे. बहुतांश पानवटे कोरडे पडल्याचे चित्र आहे.काही पाणवट्यामधील पाणी कमी झाल्याने प्राण्यांना पाणी पिणे शक्य नाही.

वास्तविक जनवरी महिन्यापासूनच जंगलातील पाण्याचे स्तोत्र कमी होण्यास सुरुवात होते. मात्र यंदा फरवरीच्या शेवटपासून मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले खरे, मात्र जंगलातील पानवठे व नदीला यांना भरपूर पाणी उपलब्ध झाले होते. मात्र हे पाणी किती काळ टिकणार याची शाश्वती नाही. शेवटी जिल्ह्याचे तापमान वाढत असल्याने पानवटे कोरडे पडायला सुरुवात झाली.

पाणवठे झाले नादुरुस्त

गत तीन वर्षात वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी बुलढाणा विभागात २८ कृत्रिम पानवटे निर्माण करण्यात आले होते. तर आणखीही नवीन पाणवठे बनवण्याची वनविभागाचे नियोजन आहे. जुना पानवठ्यापैकी अनेक पानवटे नादुरुस्त आहे. त्यामधील प्लास्टिक फाटले असून तरी तत्काळ दुरुस्ती करावी अशी आवश्यकता आहे. बुलडाणा शहरातील प्राणी मित्र व सामाजिक संघटनांच्या वतीने मागील काही दिवसापासून जंगलातील कृत्रिम पानावठे स्वच्छ करून त्यात पाणी भरण्याचे काम सुरु आहे.

विविध प्राण्याचा अधिवास

ज्ञानगंगा अभयारण्यात विविध प्रजातीच्या प्राण्यांचा अधिवास आहे बिबट्या, अस्वल, रांडुक्कर, तडस, कोल्हा, लांडगा, नीलगाय, हरण, मोर, ससे, अजगर यासह विविध प्रजातीचे पक्षी येथे आढळतात. प्राण्यांची मोठी संख्या पाहता अभयारण्यात त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. याशिवाय कृत्रिम पानवट्यामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम वन विभागाकडून करण्यात येत आहे.