बाथरूममध्ये जाणे भोवले; सोन्याचे बिस्कीट चोरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नागपूर : हॉटेल अवधमध्ये मुक्कामी असणाऱ्या ग्राहकाच्या बॅगमधील 9.60 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणाऱ्यास अटक करण्यात धंतोली पोलिसांना यश आले आहे. निखिल मेश्राम (30, रा. गडचिरोली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.

नागपूर : हॉटेल अवधमध्ये मुक्कामी असणाऱ्या ग्राहकाच्या बॅगमधील 9.60 लाखांचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेणाऱ्यास अटक करण्यात धंतोली पोलिसांना यश आले आहे. निखिल मेश्राम (30, रा. गडचिरोली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
निखिल धंतोलीतील हॉटेल अवधच्या शेजारी असलेल्या अवध रेस्टॉरेंटमध्ये वेटर म्हणून कामाला होता. तेलंगणाच्या खम्मम येथील अमदुगला पाटी वेंकटरामाराव (56) हे प्रसिद्ध भविष्यवेत्ते आणि वास्तुविशारद आहेत. 20 ऑगस्टला ते नागपुरात आले. हॉटेल अवधमधील 214 क्रमांकाच्या खोलीत थांबवले. हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी 259 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट खरेदी केले. प्रकृती खालावल्याने ते दोन दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होते. हॉस्पिटलमधून सुटी मिळताच हॉटेलमध्ये जाऊन तपासणी केली असता सोन्याचे बिस्कीट बेपत्ता होते. तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. विचारपूस केली असता वेंकटरामाराव यांनी शेजारच्या रेस्टॉरेंटमधील वेटर निखिल जेवण घेऊन येत असल्याचे सांगत त्याच्यावर शंका व्यक्त केली. पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने सध्या अमरावतीत असल्याचे सांगितले. मोबाईल लोकेशन मात्र गडचिरोलीतील दाखवीत होते. तो दिशाभूल करीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गडचिरोलीतून त्याच्या मुसक्‍या आवळल्या. वेंकटरामाराव बाथरूममध्ये असताना सोन्याचे बिस्कीट चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून सोन्याचे एकूण 246 ग्रॅम वजनाचे एक बिस्कीट व रवा असा एकूण नऊ लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of gold biscuits