उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गुरुवारी एकाच दिवसात उपराजधानीत पाच ठिकाणी चोरी, जबरी चोरी आणि लुटपाटीच्या घटना पुढे आल्या आहेत. 

नागपूर - चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. गुरुवारी एकाच दिवसात उपराजधानीत पाच ठिकाणी चोरी, जबरी चोरी आणि लुटपाटीच्या घटना पुढे आल्या आहेत. 

जगदंबा ज्योती अपार्टमेंट येथील रहिवासी तलविंदरसिंग जंजूआ (23) गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास मोहम्मद रफी चौकातील आपल्या आर. के. गारमेंट नावाच्या प्रतिष्ठानात ग्राहकांना कपडे दाखविण्यात व्यस्त होता. त्याच वेळी 30 वर्षे वयोगटातील अनोळखी आरोपी त्याच्या दुकानात आला. त्याने कपडे दाखविण्यास सांगितले. कपडे घेण्यासाठी मागे वळताच आरोपीने लोखंडी रॉडने तलविंदरसिंगच्या डोक्‍यावर प्रहार करीत गंभीर जखमी केले. यानंतर आरोपीने त्याच्या खिशातील 3 हजार रुपये रोख हिसकावून पळ काढला. अजनी परिसरातील रहिवासी प्रांजल मानकार (17) गुरुवारी दुपारी देवेश यादव नावाच्या मित्रासोबत केंद्रीय विद्यालयामागील रेल्वे कॉलनी परिसरातून घरी जात असताना 20 वर्षे वयोगटातील दोन अनोळखी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 60 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हिसकावून घेतले. सीआरपीएफ गेटजवळील रहिवासी सुनीता गभने गुरुवारी सकाळी निलडोह वस्ती येथे पायी जात असताना अनोळखी आरोपी मोपेडने आला. सुनीता यांच्या गळ्यातील 12 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. मनीषनगरातील रहिवासी सुनीता दाभाडे (45) या गुरुवारी सायंकाळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दोन अनोळखी आरोपी दुचाकीवरून आले. मागे बसलेल्या आरोपीने दाभाडे यांच्या हातातील 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल असलेली पर्स हिसकावली आणि दोघेही पळून गेले. आजमशहा चौकात लल्लूभाई मुर्गीवाले (62) यांचा चिकनविक्रीचा व्यवसाय आहे. दुकानातील तीन लोखंडी पिंजरे, वजन, इन्व्हर्टर, हातठेला, शेगडी, टेबल-स्टूल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Theft in nagpur