"तळीरामां'साठी पिण्यासोबत मस्त "खाण्या'चीही सोय !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

  • उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून व्यवसाय
  • बुटीबोरीतील विक्रेत्यांची मस्त कमाई
  • संत नगरी म्हणून प्रसिद्‌ध गावात अवैध धंदे

टाकळघाट (जि.नागपूर) ः दारूच्या दुकानात आलेल्या ग्राहकांची पिण्याबरोबरच खाण्याची सोय असेल तर ग्राहक हमखास अशा दुकानांकडे वळतातच. नेमके हेच हेरून दुकानमालकांनी या ग्राहकांना "चखणा' अर्थात चटपटीत खाद्यपदार्थ पुरविण्याची मस्त "आयडिया' शोधून काढली. ग्राहकांना काय त्यांची पिण्याबरोबर "खाण्या'चीही सोय होत असेल तर त्यांच्यासाठी "सोने पे सुहागाच'. ग्राहक दुकानदारांच्या या आमिषाला आकर्षित होत असून बुटीबोरीतील दुकानदार मस्त "कमाई'च्या मागे लागले आहेत. दुकानदार हे सर्व नियम धाब्यावर बसवून धंदा करीत आहेत.

 

गाव "संतनगरी'; व्यवसाय अपवित्र
बुटीबोरी शहरातील देशी दारू व्यावसायिकांकडून नियम सर्रास धाब्यावर बसविले जात असून दुकांनाच्या आतमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानांची पाहणी करून त्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
अवैध दारूचा पुरवठा करणे नियमभंग करणाऱ्या आदेशाच्या विरोधात संबंधितांचा परवाना रद्द किंवा निलंबन करण्याचे अधिकार असताना या सर्व नियमांना बासनात गुंडाळून ठेवण्यात येत आहेत. टाकळघाट या गावाची संतनगरी म्हणून ओळख आहे. येथे असलेल्या विक्‍तुबाबा व विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरास शासनातर्फे "ब' दर्जा देण्यात आला आहे. परंतु, गावात दारू मिळत असल्याने आदर्श ग्राम बनविण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कारवाईची मागणी
गावामध्ये मद्यपींना सेवा पुरविण्याकरिता सकाळपासूनच दारूची दुकाने सुरू होतात. रात्रीपर्यंत दुकानात "तळीरामां'चा वावर असतो. महत्त्वाचे म्हणजे या दुकानमध्येच खाद्यपदार्थांची (चकणा) सोय असल्याने दारुड्याची फार मज्जाच असते. त्यासाठी विशेष टेबल लावलेले असतात. परंतु, हा सर्व प्रकार नियमबाह्य असताना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास सुरू आहे. त्यामुळे यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.

शौचालय व पार्किंगची सोय नाही
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे व्यावसायिकांना काही नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असताना कुठेच नियमांचे पालन होत नाही. दुकानांमध्ये शौचालय, वाहनांसाठी पार्किंग आदी गोष्टी असणे आवश्‍यक आहे. दुकानाचा परवाना घेतेवेळी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून नकाशामध्ये आवश्‍यक गोष्टी समाविष्ट करण्यात येतात. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्यक्षरित्या जर अधिकाऱ्यांनी या सर्व बाबीची पाहणी केल्यास सत्य समोर येऊ शकते.

महिलांना होतोय मनस्ताप
अस्वस्थ झाल्यामुळे दारू पिण्यासाठी मद्यपी दारूच्या दुकानापर्यंत पोहोचतात. त्यानंतर दारू ढोसली की या मद्यपींना कशाचेही भान राहत नही. घरामध्ये दारू पिवून आल्यावर पतिपत्नी यांच्यात होणाऱ्या भांडणामुळे घरातील वातावरण दूषित होते. त्याचा परिणाम महिला वर्गावर दिसून येते. दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत.

दारूचा पुरवठा करण्यासाठी महागडया कारचा उपयोग
चंद्रपूर, वर्धा अशा दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूची ने-आण करण्यासाठी महागड्या कारचा उपयोग केला जातो. या कारमधून दारूचा पुरवठा केला जातो, असा विचार कुणाच्याच डोक्‍यात येत नाही. त्यामुळे या महागड्या कारचा उपयोग केल्याने पोलिस कारवाई करण्यात अपयशी ठरतात. बुटीबोरी, टाकळघाट परिसरात 7 बार, वॉइनशॉप, बिअर शॉपी असल्याने मोठ्या प्रमाणात दारूपुरवठा केला जातो. दारूच्या गाड्या पाठलाग करून पकडणे पोलिसांसाठी एक कसरत असून दारूच्या गाड्यांची "स्पिड' जोरात राहात असल्याने पोलिसांच्या अंगावर गाड्या नेण्यासह चोरटे कमी करीत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is also the convenience of eating and drinking "cool" meals for the ponds