राजाश्रय मिळूनही भाषेच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह कायम

राजाश्रय मिळूनही भाषेच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह कायम

अकोला : ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे। नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे..’ माधव ज्युलियन यांच्या काळात राजभाषा नसलेली मराठी भाषा आता राजभाषा झाली. पण तरीसुद्धा या राजभाषेच्या वैभवाची वस्त्रे तिच्या अंगावर दिसत नाहीत. राजभाषा झाल्यानंतरही मराठीला कुठेतरी दुय्यम वागणूक अजूनही मिळते आहे आणि या भाषेचा कोंडमारा जाणीवपूर्वक केला जात असल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा होणारा ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शासनस्तरावर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक अनेक चांगले निर्णय घेण्यात येत आहेत. मात्र, प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्याची भाषाभिरुची वाढवण्यासाठी जागरुक पालकांनी आणि समाजाने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाल्याचे मराठी भाषा तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

हिंदी, तामीळ, कन्नड, मल्याळम, बंगाली भाषीक जशी आपल्या भाषेची काळजी घेतात. भाषेच्या भवितव्याबाबत चिंतीत असतात, संघर्ष करतात तेवढे आपण मराठी भाषीक करत नाही. मराठी भाषीक एकमेकाशी बोलतानाही हिंदीचा उपयोग करतात. दुकानाच्या पाट्या मराठीत करून राजकीय लाभ होईलही मात्र भाषेला फारसा उपयोग नाही. इंग्रजी मराठी भाषीकाने शिकलीच पाहिजे परंतु मराठीचा बळी देऊन नको. राजकीय पातळीवरच नाही तर प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर प्रत्येकाने मराठी जपली पाहिजे.
- नारायण कुलकर्णी कवठेकर, ज्येष्ठ कवी तथा विदर्भ साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष.


जोपर्यंत ग्रामीण संस्कृती टिकून आहे. तोपर्यंत मराठी टिकून राहिल. मराठीच्या वेगवेगळ्या बोली भाषा नव्याने निर्माण होत आहेत. लोप पावण्याचे प्रमाण असले तरी बोलीभाषा आजही प्रभावी आहे. बोली भाषेच्या संवर्धनासाठी अक्षर वाङमय निर्माण झाले पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन लिखान सुध्दा वाढत आहे.
- रावसाहेब काळे, वऱ्हाडी बोली भाषा अभ्यासक


मराठी राजभाषा दिनानिमित्त अवघ्या मराठी विश्वाचे अभिनंदन व सामान्यांपर्यंत मराठीचे अभिसरण करणाऱ्यांना अभिवादन ! अभिनंदन आणि अभिवादन यासाठी की, मराठीयांचे रसिकत्व दिवसेंदिवस बहरू लागलेले दिसत आहे. साहित्य संमेलन असो अथवा नाट्य संमेलन असो रसिकांची भरभरून उपस्थिती व वाङमयीन खरेदीचा उत्साह याची साक्ष आहे. सांस्कृतिक, सामाजिक, चित्रपट, साहित्य, शिक्षण, कोशनिर्मिती, वृत्तपत्र ....अशा अनेक स्तरावर दर्जेदार निर्मिती झालेली व होत असलेली पहावयास मिळते. संगणक-महाजालावरही मराठीमधून विविध विषयांची मांडणीही भरपूर झालेली आहे. या उपलब्धींचा व मराठीला अनुकुल असलेल्या परिस्थितीचा आपण कसा उपयोग करतो यावर मंथन होण गरजेच आहे. आता आवश्यकता आहे.  ‘मराठीच्या अभिसरणाचा वेग वाढविण्याची’. याचीच चिंता सर्वांनी वाहिली पाहिजे. मायमराठीचे ऋण मान्य करणाऱ्या प्रत्येकाचा हाच संकल्प असावा.
- गजानन कुळकर्णी, अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी अध्यापक परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com