शिवरमध्ये पाण्याची अजब कथा, टँकरने अपुरा पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

टाकीतील पेयजल कोणी चोरून नेऊ नये म्हणून पेयजलाच्या टाक्यांना नागरिकांकडून कुलूप लावल्या जात आहे. 

अकोला - महानगरपालिका प्रभाग १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या गावासाठी महानगरपालिकेचा तीन हजार लिटरचा केवळ एक टँकर सुरू आहे. या गावातील पेयजलाच्या टाक्या आता जणू पाण्याच्या तिजोऱ्या बनल्यागत झाल्या आहेत. टाकीतील पेयजल कोणी चोरून नेऊ नये म्हणून पेयजलाच्या टाक्यांना नागरिकांकडून कुलूप लावल्या जात आहे. 

या गावालगत एमआयडीसी चा परिसर असल्यामुळे मजुरांची संख्या या गावात मोठ्या प्रमाणात आहे. या गावाची लोकसंख्या १० हजाराच्या जवळपास असून, महानगरपालिकेचा तीन हजार लिटरचा केवळ एक टँकर सुरू आहे. एक टँकर या गावात ता. २३ मार्च २०१८ पासून सुरू करण्यात आला असून, तो सुध्दा नियमित सुरू नाही. या गावात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खासगी पाण्याचा टँकर विकत घेणे या गावातील नागरिकांना परवडत नाही. खासगी टँकरवाल्यांनी सुध्दा टँकरची भाववाढ केली असून, एक हजार लिटरचा पाण्याचा एक टँकर २०० ते ३०० रुपयाला मिळत आहे. या परिसरातील खासगी बोअरवेल वरून पाण्याची विक्री जोरात सुरू आहे. या परिसरातील पाझर तलावे आटले असून, हातपंपाची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक हातपंप बंद पडलेले आहेत. या गावातील नागरिक सकाळीच उठून एक ते दोन किलोमीटर अंतरारून पाणी भरत आहे. या गंभीर बाबीची महानगरपालिका प्रशासनाने त्वरित दाखल घेऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी गावातील नागरिकांची मागणी जोर धरत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is insufficient supply of water tank in Shivar Akola