खेळासारखा दुसरा गुरू नाही -इरफान पठाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर : क्रिकेट हा माझ्यासाठी फक्‍त एक खेळ नसून तो गुरू आहे. कारण खेळाच्या माध्यमातून मला "टीम स्पिरिट' शिकायला मिळाले. शिवाय एकमेकांच्या यशात वाटेकरी होता आले. त्यामुळे खेळासारखा दुसरा गुरू नाही, अशा शब्दात भारताचा मध्यमगती गोलंदाज इरफान पठाणने भावना व्यक्‍त केल्या.

नागपूर : क्रिकेट हा माझ्यासाठी फक्‍त एक खेळ नसून तो गुरू आहे. कारण खेळाच्या माध्यमातून मला "टीम स्पिरिट' शिकायला मिळाले. शिवाय एकमेकांच्या यशात वाटेकरी होता आले. त्यामुळे खेळासारखा दुसरा गुरू नाही, अशा शब्दात भारताचा मध्यमगती गोलंदाज इरफान पठाणने भावना व्यक्‍त केल्या.

मानकापूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत "इनटॅक्‍स 2017' क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून तो बोलत होता. इरफान म्हणाला, वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षणाची फारशी संधी मिळाली नाही. पण, प्रत्यक्षात क्रिकेटने खूप काही शिकविले. माझ्यासाठी खेळ हाच सर्वांत मोठा गुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता संघर्ष करणे, हे केवळ खेळच शिकवू शकतो.

करिअरमधील अविस्मरणीय प्रसंग विचारला असता इरफानने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यापूर्वी कर्णधार सौरव गांगुलीच्या हस्ते "इंडिया कॅप' मिळणे, हा क्षण आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण होता, असे सांगितले. याशिवाय 2007 मध्ये टी-20 विश्‍वकरंडकातील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीत कांगारूंना पराभूत करणे, हा प्रसंगदेखील आयुष्यात कदापि विसरू शकत नसल्याचे तो म्हणाला.

परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे घेतलेल्या ऐतिहासिक हॅट्‌‌‌ट्रिकबद्दल इरफान म्हणाला, करिअरमध्ये हॅट्‌‌‌ट्रिकची संधी मिळण्याची ती तिसरी वेळ होती. दोन्ही वेळा संधी हुकल्याने तिसरा चेंडू टाकतेवेळी कमालीचा "नर्व्हस' होतो. परंतु, स्वत:ला सांभाळत चेंडू टाकला. हॅट्‌‌‌ट्रिक पूर्ण झाल्यावर विश्‍वासच बसत नव्हता. तो क्षण माझ्यासाठी अत्यानंदाचा होता. थोरल्या भावासोबतच्या संबंधाबद्दल इरफान म्हणाला, युसुफभाईला आदर्श मानतो. त्याच्यासारखा चांगला भाऊ मिळणे, हे भाग्य समजतो. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या अगोदर संधी मिळाल्याने अनेक जण त्याला "ये इरफान का भाई हैं' असे संबोधत असे. क्रिकेटर असलेल्या मोठ्या भावासाठी तो क्षण खूप अवघड होता. परंतु, उशिरा का होईना जेव्हा तो टीम इंडियाकडून खेळला, तेव्हा सर्वाधिक आनंद मलाच झाला हेही तेवढेच खरे
.
इरफानने "कमबॅक'ची आशा सोडली नाही. मी अजूनही टीम इंडियात पुनरागमनाबद्दल आशावादी आहे. त्यासाठी माझी मेहनत सुरू असून, सातत्यपूर्ण कामगिरीसोबतच फिटनेसवरही अधिक लक्ष देत आहे. आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून संघात परतण्याचा माझा प्रयत्न आहे.

भारतवासी असल्याचा अभिमान
इरफानने पाकिस्तान दौऱ्याच्या वेळी लाहोरच्या एका कॉलेजमध्ये घडलेली एक घटना यावेळी शेअर केली. तो म्हणाला, त्या कार्यक्रमादरम्यान एका पाकिस्तानी विद्यार्थिनीने तुम्ही मुसलमान असूनही भारताकडून का खेळता? असा प्रश्‍न विचारला होता. त्यावेळी मी म्हणालो, मी भारतात जन्मलोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिवाय मी भारतीय संघाचा सदस्य आहे, याचा त्यापेक्षा अधिक अभिमान आहे. भारतवासी असल्याचा मला नेहमीच अभिमान असून, सदैव राहणार आहे.

 

Web Title: there is no other teacher such as sports