...इथे कुणी आता झाड तोडत नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

हिंगणघाट येथे वृक्षलागवड, जलसंधारणातून अनोखे ‘पर्यावरण संवर्धन’

नागपूर - हिंगणघाट येथे पर्यावरण संवर्धन संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून अनोखी जनजागृती सुरू केली. परिणामी, किमान २०० घरी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सुरू झाले. दोन हजार वृक्षलागवड झाली. ‘ट्री गार्ड’ लावून संवर्धन सुरू केले. नगरप्रशासनही पुढे आले. त्यामुळे आता कुणी झाडं तोडताना दिसत नाही.

हिंगणघाट येथे वृक्षलागवड, जलसंधारणातून अनोखे ‘पर्यावरण संवर्धन’

नागपूर - हिंगणघाट येथे पर्यावरण संवर्धन संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून अनोखी जनजागृती सुरू केली. परिणामी, किमान २०० घरी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सुरू झाले. दोन हजार वृक्षलागवड झाली. ‘ट्री गार्ड’ लावून संवर्धन सुरू केले. नगरप्रशासनही पुढे आले. त्यामुळे आता कुणी झाडं तोडताना दिसत नाही.

अभिजित डाखोरे, आशीष भोयर, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, गौरव जामूनकर, छत्रपती भोयर, मनोहर ढगे,  प्रवीण कडू, ज्ञानेश्‍वर चौधरी, गिरधर काचोळे, हेमंत हिवरकर, योगेश तपासे, सचिन थूल आदी झपाटलेली माणसे एकत्र आली. यातील बहुतेक कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात काम झोकून देऊन काम करणारी आहेत. जलसंधारण, वृक्षलागवड-संवर्धन आणि स्वच्छता ही त्रिसूत्री घेत ‘पर्यावरण संवर्धन संस्था’ सुरू केली... आणि मग जनजागृतीची कामे सुरू झाली.   मंडळी गुरुवारी नागपूर येथे ‘सकाळ संवाद’मध्ये सहभागी झाली. त्यांच्या आशादायी अभियानाची माहिती त्यांनी दिली.

शहरात ठिकठिकाणी लोकांसोबत छोट्या-मोठ्या सहा सभा घेतल्या. शहरातील पाणीपातळी घसरत चालली  आहे. भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पाणी साठवले पाहिजे, अशी लोकांना विनंती केली. तत्कालीन नगराध्यक्ष सुधीर कोठारी यांच्यासोबत पाच बैठका झाल्या. नवीन घर बांधताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे उपकरण बसवले की नाही, याची तपासणी केल्यावरच नाहरकत प्रमाणपत्र द्या, अशी विनंती केली. लोकही तयार झाले. नगरपालिकेनेही अंमलबजावणीवर कडक लक्ष दिले. बघता-बघता अनेक घरी घरावर पाणी साठविण्याचे उपकरण लावले गेले. बीडकर महाविद्यालय, महेश ज्ञानपीठ स्कूल, ज्ञानदीप विद्यानिकेतन आदी सहा शाळांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सुरू केले. नगरपालिका प्रत्यक्ष उपकरण पाहिल्याशिवाय आणि फोटो जोडल्याशिवाय पुढील बांधकामाला परवानगीच देत नाही. 

पाणी साठविण्यासोबतच वृक्षलागवडीची अनोखी चळवळ उभी केली. परंतु, उपयोगी तेच झाडं लावायचे. मोह, बिहाडा, हिरडा, रक्तचंदन, अर्जुन आदी पर्यावरणपूरक आणि थेट उपयोग होईल, अशी झाडे लावायला सुरुवात केली. ट्री गार्डही लावले. पक्ष्यांनी यावे, अशीच ही झाडे आहेत. विशेष म्हणजे यासाठी सभासद नोंदणी, लोकवर्गणी, स्मृतिदानातून निधी उभारला गेला. स्वच्छतेचा वसाही त्यांनी घेतला आहे. दर रविवारी सकाळी बसस्थानकावर स्वच्छता मोहीम राबवितात.

नगरपालिकेने सर्व सफाई कर्मचाऱ्यांना रविवारी सुटी न देता आठवड्यातून आलटूनपालटून करावी. लोकांनी कचरा डस्टबिनमध्ये गोळा करून घंटागाडीत टाकावा. पावसाचे संपूर्ण पाणी साठवावे, असा संदेशही ते देतात.

चौदांच्या बदल्यात १९०
रस्ता रुंदीकरणासाठी नगरपालिकेने १४ झाडे तोडली होती. पर्यावरण संवर्धन संस्थेने न्यायालयाचे दार ठोठावले. नगरपालिकेला चूक उमजली. १९० झाडे लावण्यासाठी अडीच लाख मंजूर केले.

Web Title: there is not anybody tree cutting