धक्‍कादायक! शासनाने गरीबांना पोट भरण्यासाठी दिलेल्या तांदळावरही व्यापाऱ्यांचा डोळा

महेंद्र जुन्नाके
Tuesday, 7 July 2020

शासनाने पोटाची खळगी भरण्याकरिता गरजवंतांना दिलेला तांदूळ विकत घेण्यासाठी अनेक व्यापारी गावात फिरत आहेत. अडचणीत असलेल्या खेड्यातील काही लोकांशी संधान साधून त्यांच्याकडून 10 रुपये पायलीच्या हिशोबाने हा तांदूळ खरेदी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता या योजनेला पाच महिन्यांची वाढ मिळाल्याने अनेकांकडून तर ऍडव्हान्स बुकिंग झाल्याचेही बोलले जात आहे.

खरांगणा ( जि.वर्धा) : लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या हाताचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. रोजंदारीने काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचे निदान पोट भरावे, यासाठी शासनाकडून त्यांना किमान तांदुळ पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. देशावर आलेल्या संकटातही केवळ आपलेच खिसे भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वार्थी व्यापाऱ्यांनी ही संधीही सोडली नाही.
शासनाने पोटाची खळगी भरण्याकरिता गरजवंतांना दिलेला तांदूळ विकत घेण्यासाठी अनेक व्यापारी गावात फिरत आहेत. अडचणीत असलेल्या खेड्यातील काही लोकांशी संधान साधून त्यांच्याकडून 10 रुपये पायलीच्या हिशोबाने हा तांदूळ खरेदी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता या योजनेला पाच महिन्यांची वाढ मिळाल्याने अनेकांकडून तर ऍडव्हान्स बुकिंग झाल्याचेही बोलले जात आहे.
कोरोना काळात सर्व रोजगार ठप्प झाल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला. तर लॉकडाउनमुळे बरीच कामे ठप्प झाली. यामुळे बेरोजगार असलेल्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही याची दक्षता घेत शासनाने प्रतिव्यक्‍ती पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. त्यावर तत्काळ अंमलबजवणीही झाली. लाभाच्या यादीत असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना हा तांदूळ मिळाला. काही घरी सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांच्या घरी मोठ्या प्रमणात हा तांदूळ आला. त्यातील बराच तांदूळ शिल्लक असल्याचे पुढे आले. याच संधीचा लाभ उचलण्याकरिता काही व्यापाऱ्यांनी नवी शक्‍कल लढविली.
खरांगणा (मोरांगणा) गावात एका व्यापाऱ्याने आपले एजंट पाठवून गरजू लोकांशी संपर्क साधला. त्यांना पैशाचे आमिष देत दहा रुपये पायलीच्या दरात हे तांदूळ खरेदी करणे सुरू केले. पाहता पाहता याची माहिती गावातील अनेकांना मिळाली. त्यांनीही या एजंटशी संपर्क करून आपल्या घरी शिल्लक असलेला आणि काहींनी गरजेपेक्षा अधिक असलेला तांदूळ या व्यापाऱ्यांना देण्याचा प्रकार सुरू केला. या प्रकारातून व्यापाऱ्यांची वाहने भरून खरेदी होऊ लागली आहे. हा प्रकार वर्धेतच नाही तर सर्वत्रच सुरू असल्याची माहिती आहे.

गरजेपोटी होते विक्री
या संदर्भात गावात तांदूळ विकणाऱ्या एका व्यक्‍तीला विचारणा केली असता त्याने हाताला रोजगार नाही. गाठीला पैसा नाही. म्हणून मिळालेले धान्य विकत असल्याचे सांगितले. असे तांदुळ विकणारे एक नाही अनेक जण असल्याचे या व्यापाऱ्याच्या वाहनात भरलेल्या तांदळाच्या पोत्यावरून लक्षात आले. हा प्रकार रोखण्यासाठी शासनाने रोजगाराची सोय करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा - पोलिस अधिकाऱ्यांच्या चालकाची आत्महत्या! स्वत:वरच झाडून घेतली गोळी

ऍडव्हान्स बुकिंगचाही प्रकार
शासनाने ही योजना आता पाच महिन्यासाठी वाढविली आहे. यामुळे मिळणाऱ्या तांदळासाठी आतापासूनच बुकिंग सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे गरिबांच्या पोटचा घास घेणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर वचक निर्माण होण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They are doing business in this worst Situation also