esakal | जिल्ह्यातील जमिनीवर पाय ठेवताच त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले 
sakal

बोलून बातमी शोधा

Bus station

तेलंगणातील रायनापां स्थानकावरून रात्री दोन वाजताच्या सुमाराला श्रमिक स्पेशल ट्रेन नागभीडच्या दिशेने रेल्वे निघाली. नागभीड रेल्वेस्थानकावर सकाळी 9.30 वाजताच्या सुमाराला रेल्वे पोचली.

जिल्ह्यातील जमिनीवर पाय ठेवताच त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागभीड (जि. चंद्रपूर) : लॉकडाउनमुळे तेलंगणात अडकलेले जिल्ह्यातील 780 प्रवासी विशेष रेल्वेगाडीने शुक्रवारी, 8 मे रोजी नागभीड रेल्वेस्थानकावर सकाळी 9.30 वाजताच्या सुमाराला पोहोचले. मागील दीड महिन्यांपासून हालअपेष्टा सहन करीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मजुरांचाही यात समावेश होता. नागभीड रेल्वेस्थानकावर पोचल्यानंतर अनेकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले. आपल्या गावात पोचणार, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत होते. 

अवश्य वाचा- कर्तव्याला सलाम! अमरावतीत कोविड वॉर्डातील परिचारिकेचे पुष्पवृष्टीने स्वागत 

तेलंगणातील रायनापां स्थानकावरून रात्री दोन वाजताच्या सुमाराला श्रमिक स्पेशल ट्रेन नागभीडच्या दिशेने रेल्वे निघाली. या रेल्वेत गडचिरोली जिल्ह्यातील 98, चंद्रपूर जिल्ह्यातील 615, गोंदिया जिल्ह्यातील 62 तर नागपूर जिल्ह्यातील 02 अशा चार जिल्ह्यांतील एकूण 780 प्रवासी आणि मजुरांचा समावेश होता. नागभीड रेल्वेस्थानकावर सकाळी 9.30 वाजताच्या सुमाराला रेल्वे पोचली. यावेळी मजुरांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यानंतर तालुक्‍यानुसार त्यांची विभागणी करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाच्या 24 बसेस, खासगी 8 आणि दोन स्कूल बसच्या साहाय्याने त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. 

स्थानिकांनी केले मजुरांचे स्वागत 

यावेळी नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रीतम खंडाळे, आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, ठाणेदार दीपक गोतमारे, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश खेवले, ब्रम्हपुरी आगार प्रमुख सुरेश वासनिक, ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, नगराध्यक्ष डॉ. उमाजी हिरे, जि.प. सदस्य संजय गजपुरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर उपस्थितीत होते. त्यांनी मजुरांचे स्वागत केले. आरोग्य विभागाच्या वतीने प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. नगर परिषदेच्या वतीने रेल्वे आणि रेल्वे परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रवाशांना आमदार बंटी भांगडिया यांच्यातर्फे फ्रुट किट, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, मास्क, बिस्कीट पाकीट देण्यात आले. 

loading image