"त्यांना' मिळायचे दोन वेळचे जेवण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

परराज्यातील गरजू मुलींना हेरून त्यांच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेतला जात होता. मुलींना ग्राहकामागे पाचशे रुपये मिळेल, असे आमिष दाखविले जात होते. प्रत्यक्षात त्यांना दोन वेळचे जेवण मिळायचे. चोविसतास ग्राहकांना खूष करावे लागत होते. 

यवतमाळ : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला आणि सातत्याने चर्चेत असलेल्या येथील दारव्हा मार्गावरील जसराणा अपार्टमेंटमधील कुंटणखान्यावर छापा टाकून देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. परराज्यातील मुलींना पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात होता. प्रत्यक्षात "त्या' मुलींना केवळ दोन वेळचेच जेवण मिळायचे. पैसे दिल्यास मुली पळून जातील, ही भीती आँटीला असल्याने तीने खास खबरदारी घेतली होती.

गेल्या रविवारी (ता. तीन) येथील जसराणा अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये देहविक्रय व्यवसाय चालविणारे दीपक मानकर व एक महिला जाळ्यात अडकली. सिकंदराबाद, छत्तीसगड, यवतमाळ येथील महिला, तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लोहारा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दीपक मानकर ,जितू खत्री यांच्यासह अन्य दोन महिलांविरुद्घ गुन्हा नोंदवून त्यांना अटकही केली. परराज्यातील गरजू मुलींना हेरून त्यांच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेतला जात होता. मुलींना ग्राहकामागे पाचशे रुपये मिळेल, असे आमिष दाखविले जात होते. प्रत्यक्षात त्यांना दोन वेळचे जेवण मिळायचे. चोविसतास ग्राहकांना खूष करावे लागत होते. 

त्यातून आलेली पूर्ण रक्कम आँटी स्वत:कडे ठेवायची. यवतमाळ सोडताना त्यांना काही रक्कम देऊन बोळवण करण्यात येत होती. छत्तीसगडमधील एका मुलीला सव्वा वर्षापूर्वी येथे आणण्यात आले होते. त्यावेळी ती अल्पवयीन होती. आता 19 वर्षांची झाली आहे. त्यामुळे पोलिस "पोक्‍सो'अंतर्गत गुन्हा दाखल करतात का, याकडे लक्ष लागले आहे. जसराणा अपार्टमेंटमध्ये दिवसभर राहणारी ग्राहकांची वर्दळ आणि चालणाऱ्या नको त्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिक चांगलेच वैतागले होते. मात्र, कुणीही भीतीपोटी तक्रार करण्यास धजावत नव्हते. 

दिवसाला जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त कमाई आँटी व तिच्या साथीदारांच्या खिशात जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या व्यवसायातून आँटी मालामाल झाली असून, तिने नागपूर येथे मालमत्ता खरेदी केली. अलीकडे घेतलेल्या आलिशान वाहनातून मुलींना आणण्याचे काम चालायचे. पोलिसांनी खोलात तपास केल्यास या व्यवसायातील काळा चेहरा समोर येऊन आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. टोळीविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर तपास आता यवतमाळ ग्रामीणच्या ठाणेदारांकडून केला जात आहे. 

"ब्लॅकमेलिंग'मधूनही कमाई
मालदार ग्राहक आल्यास त्याची विशेष बडदास्त राखायची. खेळ रंगात येताच फोटो आणि व्हीडीओ शूटींग केली जायची. बदनामी करण्याची धमकी देवून ब्लॅकमेलिंगद्वारे लाखोंची रक्कम वसूल करण्याचा चालणारा गोरखधंदादेखील अनेकदा चर्चेत आला होता.

या प्रकरणाचा तपास गांभीर्याने केला जात आहे. 19 वर्षे वय असलेल्या "त्या' मुलीचे स्टेटमेंट लवकरच नोंदविण्यात येईल. त्यानंतर पुढील तपासाची दिशा निश्‍चित केली जाणार आहे. दोन दिवसांपासून आम्ही बंदोबस्तात व्यस्त आहोत.
- मनोज केदारे, ठाणेदार, ग्रामीण पोलिस ठाणे, यवतमाळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "They 'got to have two lunch