esakal | ओ माय गॉड! पोलिस गस्तीवर, तरीही गॅस कटरने फोडले एटीएम... 
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

राष्ट्रीय महामार्गालगत पटवारी भवनजवळ इंद्रपस्थ कॉम्प्लेक्‍स नावाची इमारत आहे. इमारतीच्या वरच्या माळ्यावर स्टेट बॅंकेचे एटीएम आहे. हे एटीएम रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून फोडले.

ओ माय गॉड! पोलिस गस्तीवर, तरीही गॅस कटरने फोडले एटीएम... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इमारतीमधील स्टेट बॅंकेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी गॅस कटरने फोडून 9 लाख 41 हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने दोन दिवसांपूर्वीच हा भाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. गस्तीसाठी पोलिस पथक तैनात असताना झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

राष्ट्रीय महामार्गालगत पटवारी भवनजवळ इंद्रपस्थ कॉम्प्लेक्‍स नावाची इमारत आहे. इमारतीच्या वरच्या माळ्यावर स्टेट बॅंकेचे एटीएम आहे. हे एटीएम रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून फोडले. त्यातील रोकड लंपास केली. सकाळी एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला तेथील परिस्थितीवरून घडलेला प्रकार लक्षात आला. याबाबत भंडारा पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिस निरीक्षक लोकेश कानसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे हे घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञ व श्‍वानपथकालासुद्धा पाचारण करण्यात आले. त्यांनी पंचनामा व पाहणी केली. चौकशी अंती येथून 9 लाख 40 हजार रुपये लंपास झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे दोन पथक चोरांचा शोध घेत आहेत. 

अवश्य वाचा- मी काय, शरीर विकीन म्हणजे विकीन; जे होईल ते होईल जीवाचं! वाचा वारांगणेची व्यथा...

आठवड्यातील दुसरी घटना 

एटीएम फोडण्यात आल्याची ही या आठवड्यातील दुसरी घटना आहे. पाच दिवसांपूर्वी जवाहरनगर (ठाणा) येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी रोकड लांबविली होती. तसेच शहरातील राजीव गांधी चौक, कोंढा व तुमसर येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांवरून एटीएम सेंटर फोडणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसते. अलीकडे बहुतांश एटीएम सेंटरमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त नाहीत. येथील सीसीटीव्ही यंत्रणासुद्धा कुचकामी झाली आहे. ऐन वर्दळीच्या मार्गावर होणाऱ्या या घटनांमुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.