अख्खे व्यापारी संकुलच केले चोरट्यांनी टार्गेट 

Chori
Chori

यवतमाळ : येथील दत्त चौकात असलेल्या व्यापारी संकुलात चोरट्यांनी चोरीचे सत्रच सुरू ठेवले आहे. त्यांनी रात्रभरात संकुलातील तीन दुकाने फोडून चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. दुकाने फोडल्याची घटना रविवारी (ता.19) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीदेखील चोरट्यांनी याच संकुलातील चार दुकाने फोडली होती. त्यामुळे अख्खे व्यापारी संकुलच चोरट्यांनी "टार्गेट' केल्याचे दिसत आहे. 

शनिवारी फोडली तीन दुकाने

यवतमाळ येथील कोहिनूर सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहम्मद शारीक अब्दुल गफ्फार यांचे दत्त चौकात असलेल्या व्यापारी संकुलात पुस्तकांचे दुकान आहे. ते रोज सकाळी नऊ वाजता दुकान उघडतात आणि रात्री नऊ वाजता बंद करतात. शनिवारी, 18 जानेवारीला रात्री दुकान बंद करून मोहम्मद शारीक घरी गेले. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी व्यावसायिक किशोर ढाले यांनी मोहम्मद शारीक यांना फोन करून तुमच्या दुकानात चोरी झाल्याची माहिती दिली. शारीक यांनी लगेच दुकानात जाऊन पाहणी केली. यावेळी चोरट्यांनी शटर उघडून दुकानात प्रवेश करून काऊंटरमधील रोख 17 हजार रुपये चोरून नेले. तसेच राहुल लोळगे यांच्या दुकानातून 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप तसेच सुमंत शेटे यांच्या दुकानातून 18 हजार रुपयांचा लॅपटॉप लंपास केला. 

चार दुकाने फोडण्याचा प्रयत्न

चोरट्यांनी व्यापारी संकुलातील गाळे क्रमांक 24, 31, 36 आणि 41 मधील दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी याच संकुलातील दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला होता. रविवारी, 19 जानेवारीला पुन्हा 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरणी मोहम्मद शारीक यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 

चोरटे सीसीटीव्हीत कैद

शटर तोडून दुकानात चोरी करणारे चार संशयित चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने तपासात अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरट्यांची एक टोळीच शहरात सक्रिय झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या चोरट्यांना तातडीने गजाआड करण्याची मागणी करण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com