थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी हॉटेल, ढाबे सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

उशिरापर्यंत सुरू राहणार दारू दुकाने - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

भंडारा - मावळत्या वर्षाला अलविदा करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. निरोप व स्वागताचा सोहळा साजरा करण्यासाठी तरुणाई आतुर झाली आहे. अलीकडे थर्टी फर्स्ट हे एक सेलिब्रेशन म्हणून साजरे करण्याची परंपरा रूढ झाली आहे. मोठ्या शहरांसह गावातही हे लोण पसरले आहे.

उशिरापर्यंत सुरू राहणार दारू दुकाने - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

भंडारा - मावळत्या वर्षाला अलविदा करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी वेगवेगळे बेत आखले आहेत. निरोप व स्वागताचा सोहळा साजरा करण्यासाठी तरुणाई आतुर झाली आहे. अलीकडे थर्टी फर्स्ट हे एक सेलिब्रेशन म्हणून साजरे करण्याची परंपरा रूढ झाली आहे. मोठ्या शहरांसह गावातही हे लोण पसरले आहे.

थर्टी फर्स्टनिमित्त मोठे हॉटेल, रेस्टॉरंट, बार, ढाबे यांनी पूर्वतयारी केली आहे. उद्या, शनिवार असल्याने मांसाहार करणाऱ्या नागरिकांचा थोडा विरस झाला आहे. परंतु, रात्री १२ नंतर दुसरा दिवस लागतो, असा सुकर मार्ग अनेकांनी शोधला आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. त्यादृष्टीने शहरातील चिकन, मटण विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या व बोकड यांचा स्टॉक करून ठेवला आहे.

उशिरापर्यंत मद्यविक्रीला परवानगी
३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करणाऱ्यांना सरकारनेही मुभा दिली आहे. गृहविभागाच्या एका आदेशानुसार मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम १३९ अन्वये ३१ डिसेंबर तसेच नववर्षानिमित्त परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहेत. 

वनविभाग करणार कारवाई
यावेळी चांदपूर, रावणवाडी व गायमुख या पर्यटन वनक्षेत्रात गोंधळ घालण्यास वनविभागाने मनाई केली आहे. या तिन्ही ठिकाणी पर्यटकांनी मद्य प्राशन करणे, मोठ्या आवाजात स्पीकर वाजवून ध्वनिप्रदूषण करणे तसेच स्वयंपाकासह अन्य अनुचित प्रकार केल्यास साहित्यासह वाहन जप्त करून कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांनी सोबत टिफीन घेऊन यावे, शांतता व स्वच्छतेचे भान ठेवून आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन उपवनसंरक्षकांनी केले आहे. 

ड्रंक अँड ड्राइव्हवर पोलिसांची नजर
शनिवार व रविवार लागून आल्याने दोन्ही दिवस आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांची चंगळ राहणार आहे. दरम्यान, या दिवशी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन करून दुचाकीसह, मोटार कार चालविल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. सुरक्षेच्या दृष्टीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर पोलिसांची करडी नजर राहील.

पर्यटनस्थळी होणार गर्दी
थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी चांदपूर, रावणवाडी, गायमुख, कोरंभी, झिरी, गोसेधरण आदी पर्यटनाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: thirty first celebration