"त्या' विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

नागपूर - डीटीएडच्या जुन्या अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाच्या परीक्षेला बसू न देण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाला गुरुवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. तसेच त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याचे आदेश दिले. 

कविता विनायकराव जाधव आणि इतर दहा विद्यार्थ्यांनी यासंदर्भात रिट याचिका दाखल केली. विद्यार्थ्यांनी 2015-16 मध्ये डीटीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. जून-2016 मध्ये प्रथम वर्षाचा निकाल लागला. त्यात याचिकाकर्ते विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. दरम्यानच्या काळात 28 नोव्हेंबर 2016 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालकांनी डीटीएडच्या नवीन अभ्यासक्रमाची घोषणा केली. तसेच जुन्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना सरसकट नवीन अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यानुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मात्र, फेब्रुवारी-2017 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना जून-2017 मध्ये होणारी परीक्षा देता येणार नाही, असे सांगितले. याविरुद्ध विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

परीक्षेला बसू द्यायचे नव्हते तर वर्षभर आमचे वर्ग का घेण्यात आले, प्रात्यक्षिक परीक्षा का झाली, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला. परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय आधीच कळविला असता तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसते. त्यांनी प्रथम वर्षाचा अभ्यास केला असता, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने आयुक्तांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. पुढील सुनावणी उन्हाळी सुटीनंतर ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रशांत शेंडे यांनी बाजू मांडली. 

Web Title: those students sit for the test