धोकादायक इमारतींतील  हजारोंचा जीव धोक्‍यात 

राजेश प्रायकर 
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात जीर्ण इमारती असून महापालिका अद्याप जुन्याच आकडेवारीवरून तारे तोडत आहे. अतिधोकादायक, दुरुस्तीची गरज, किरकोळ दुरुस्तीची आवश्‍यकता अशी वर्गवारीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. अधिकाऱ्यांची ही अनास्था अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता बळावली आहे. 

नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात जीर्ण इमारती असून महापालिका अद्याप जुन्याच आकडेवारीवरून तारे तोडत आहे. अतिधोकादायक, दुरुस्तीची गरज, किरकोळ दुरुस्तीची आवश्‍यकता अशी वर्गवारीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. अधिकाऱ्यांची ही अनास्था अतिधोकादायक इमारतीतील नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्‍यता बळावली आहे. 

शहरात पाचशेवर जीर्ण इमारती आहेत. परंतु यातील अतिधोकादायक कुठल्या, कुठल्या इमारतींना दुरुस्तीची गरज आहे, याबाबत काहीही रेकॉर्ड महापालिकेकडे नाही. दरवर्षी अधिकारी जुनीच आकडेवारी आढावा बैठकीत सादर करून आयुक्त, पदाधिकाऱ्यांचीही दिशाभूल केली जात असल्याचे दिसून आले. शहरात जवळपास पाचशेवर जीर्ण इमारती असून यातील मोठ्या प्रमाणात अतिधोकादायक आहेत. परंतु, महापालिकेच्या लेखी केवळ दोनशेच जीर्ण इमारती असल्याची  नोंद आहे.  गेल्या तीन वर्षांपासून याच आकडेवारीच्या आधार अधिकारी घेत आहेत. ही यादी अद्ययावत करण्याबाबतही अधिकारी गंभीर नसल्याने पावसाळ्यात एखादी मोठी घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन विभाग दुर्घटनाग्रस्तांपर्यंत कसे पोहोचणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जुन्याच माहितीनुसार सर्वाधिक ६४ जीर्ण इमारती सतरंजीपुरा झोनमध्ये आहेत. यातील १९ इमारतींवर कारवाई केल्याचे नमूद केले असून २२ इमारतींवर कारवाई प्रलंबित असल्याचे या झोनच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, नेमकी काय कारवाई केली, याबाबत स्पष्टता नाही. नेहरूनगर आणि लकडगंज या झोनमध्येही मोठ्या प्रमाणात जुन्या जीर्ण इमारती आहेत. परंतु, या दोन्ही झोनने जीर्ण इमारतीची माहितीच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केली नसल्याचे समजते. त्यामुळे जीर्ण इमारतीतील रहिवाशांचा जीव धोक्‍यात असल्याचे चित्र आहे. 

राजकीय दबावात झोन अधिकारी 
एखाद्या जीर्ण घराला नोटीस दिल्यास, घरमालकाऐवजी नगरसेवक, पदाधिकारीच जागे होतात,  असे चित्र आहे. जीर्ण घर पाडल्यास मतांच्या टक्केवारीवर परिणाम होण्याच्या भीतीने नगरसेवक, मनपातील पदाधिकारी ते पाडू नये, यासाठी दबाव निर्माण करतात, असे काही अधिकाऱ्यांचे  म्हणणे आहे.

झोनला अनेकदा नोटीस 
दुर्घटना झाल्यास मदतकार्याची जबाबदारी असल्याने अग्निशमन विभागाने ६ मे २०१६, २ मे २०१७  रोजी जीर्ण घरांची यादी तयार करून विभागाकडे सादर करण्यासंदर्भात दहाही झोनला पत्र पाठविले होते. परंतु, झोन काल्पनिक आकडेवारी सादर करतात किंवा हात वर करीत असल्याचे समजते. 

जीर्ण इमारतींचा परिसर 
इतवारी, महाल, नंदनवन, सतरंजीपुरा, जागनाथ बुधवारी, मंगळवारी, जुनी शुक्रवारी, गांधीबाग, सीताबर्डी, मस्कासाथ, गोळीबार चौक, पाचपावली, सक्करदरा, हंसापुरी, इमामवाडा, गोकुळपेठ, नाईक तलाव, बांगलादेश या परिसरात सर्वेक्षण केल्यास मोठ्या प्रमाणात जीर्ण इमारती आढळून येतील. 

झोनची यादी कितपत खरी? 
लक्ष्मीनगर २६, धरमपेठ १९, हनुमाननगर ३, धंतोली ५, हनुमाननगर ५, गांधीबाग २४, सतरंजीपुरा ६४, आशीनगर १६ तर मंगळवारीमध्ये ४४ जीर्ण घरे असल्याची माहिती झोन अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी केंद्रीय कार्यालयाला दिली. नेहरूनगर व लकडगंजकडून यादी सादर करण्यात आली नाही.  

Web Title: Thousands of lives are threatened by dangerous buildings