धापेवाडा आउटलेटमध्ये लाखो मासोळ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

तुमसर (जि. भंडारा) : वैनगंगेवर असलेल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या आउटलेटमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्रवारी लाखो मासोळ्या
मृत्युमुखी पडल्याची बाब उघडकीस आली.

तुमसर (जि. भंडारा) : वैनगंगेवर असलेल्या धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या आउटलेटमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शुक्रवारी लाखो मासोळ्या
मृत्युमुखी पडल्याची बाब उघडकीस आली.
वैनगंगेवर बांधलेल्या धापेवाडा प्रकल्पात पाणी अडविण्यात आले आहे. पावसाळ्यात पावसाच्या प्रमाणानुसार प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. या वर्षी 19 जुलैपर्यंत अपुरा पाऊस झाला. त्यामुळे शेतीचे सिंचन आणि तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटला करण्यात येणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन प्रकल्पाचे सर्व गेट बंद करण्यात आले. उन्हाळ्यात जनावरांच्या पिण्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी सोडले जाते. परंतु, सध्या तेवढेही पाणी सोडण्यात येत नाही. या प्रकल्पाच्या आउटलेटमध्ये फारच कमी प्रमाणात पाणी होते. पावसाळ्यात मासोळ्यांची नैसर्गिक पद्धतीने चढण होत असल्याने या भागात लाखोंच्या संख्येने मासोळ्या होत्या. मात्र, या ठिकाणी कमी असलेले पाणी आणि प्रखर उन्हामुळे वाढलेले तापमान यामुळे लाखो मासोळ्या शुक्रवारी सकाळी मृत्युमुखी पडल्या. प्रकल्पाच्या भागात मासेमारी करणाऱ्या ढिवर बांधवांनी याबाबत माहिती दिली आहे. प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर मृत मासोळ्या प्रवाहाबरोबर वाहून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousansds of fish found dead in dhapewada lake