निम्मे अभियंते कॅम्पस बाहेरच!

विवेक मेतकर 
बुधवार, 31 जुलै 2019

इंजिनिअर होऊन झटपट नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुण पाहत आहेत. गेल्या वर्षी देशातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे.

अकोला - इंजिनिअर होऊन झटपट नोकरी मिळविण्याचे स्वप्न तरुण पाहत आहेत. गेल्या वर्षी देशातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे. यामधून जवळपास ४५ टक्के म्हणजे तीन लाख ५९ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसच्या माध्यमातून नोकरी मिळाली, तर ५५ टक्के अभियंत्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.

नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण कमी होऊ लागल्याने अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सात लाख ९२ हजार विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील तीन लाख ५९ हजार अभियंत्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरीचे पत्र मिळाले. काही विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर काही वैयक्तिकरीत्या नोकरी अथवा व्यवसायाकडे वळले असल्याची माहिती आहे.

बरेचदा कॅम्पसमधून निवड झाली नाही, तरी अनेक विद्यार्थी कॅम्पसव्यतिरिक्तही नोकरी मिळवितात. काही विद्यार्थी उच्च शिक्षणाला प्राधान्य देत असतात, तर काही विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे नोकरी मिळविणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील आकडेवारीत तफावत दिसू शकते.
-सतीश देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज, बाभूळगाव, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half lakh students got jobs Out of the eight lakhs