शिधापत्रिकाधारकांसाठी आता साडेतीन हजार क्विंटल साखर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : दिवाळी तोंडावर येऊनही रेशन दुकानांमध्ये साखर उपलब्ध न झाल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी तीन हजार 500 क्विंटल साखरेचा पुरवठा करण्यात आला असून लाभार्थी समाधान व्यक्त करीत आहेत. 

यवतमाळ जिल्ह्यात दोन हजार 50 रेशन दुकाने असून, विविध योजनांतील सहा लाख 32 हजार शिधापत्रिकाधारक आहेत. दिवाळी हा वर्षातला सर्वांत मोठा सण असल्याने लाभार्थ्यांना साखरेची प्रतीक्षा होती. मागील आठवड्यापर्यंत रेशन दुकानात साखर पोहोचली नसल्याने लाभार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागत होते. त्यामुळे लाभार्थ्यांकडून प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत होता. ही बाब लक्षात घेता दिवाळीला दहा दिवस शिल्लक असताना तीन हजार 500 क्विंटल साखरेचा पुरवठा करण्यात आला आहे. 80 टक्के रेशन दुकानात साखर पोहोचविण्यात आली आहे. याशिवाय तूरडाळ, हरभरा डाळीचा पुरवठा करण्यात येत आहे. धान्य योग्यरीत्या वितरित होत आहे की नाही, याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष ठेवून आहेत. रेशन दुकानात साखरेसह इतर धान्य उपलब्ध झाले असले तरी अनेक दुकानदार आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात आहे. दुकान बंद ठेवून अनेक रेशन दुकानदार प्रचारात व्यस्त असल्याने ऐनदिवाळीच्या तोंडावर धान्यासाठी लाभार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. अशा दुकानदारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half thousand quintals of sugar for the reshan card holders