देशी बनावटीच्या रायफलसह तिघे जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

नागपूर : लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी दुपारी प्रजापती चौकात सापळा रचून देशी बनावटीची रायफल कारमध्ये ठेवून फिरणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 30 जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आले आहे.

नागपूर : लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी दुपारी प्रजापती चौकात सापळा रचून देशी बनावटीची रायफल कारमध्ये ठेवून फिरणाऱ्या तिघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 30 जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आले आहे.
अभिजित ऊर्फ अपजित पांडे (29), जगदीश पांडे (19) दोन्ही रा. राजनगर, स्वामीनारायण मंदिरमागे, वाठोडा आणि शादाब ऊर्फ नाझीर समशेर खान (20) रा. बेलेनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. टाटा इंडिका कारमधून शस्त्रसाठा जाणार असल्याची गुप्त माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी प्रजापती चौकात सापळा रचला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास एमएच 31- सीएम 3151 क्रमांकाची टाटा इंडिका येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून डिक्कीची तपासणी केली असता त्यात गावठी बॅरल, मॅगझीन आणि लाकडी बट असलेली गावठी बनावटीची रायफल आढळली. सोबतच 30 जिवंत काडतुसेही होती. डुक्कर किंवा तत्सम जनावरांना मारण्यासाठी उपयोगात येणाऱ्या एअर गन प्रमाणे रायफलची बनावट आहे. मात्र, त्यात वापरण्यात येणारे काडतूस मोठ्या आकारातील असल्याने मानवासाठीही हे शस्त्र अपायकारक ठरू शकते. वाहनात शस्त्र दिसताच पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्‍या आवळून ठाण्यात आणले. आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर चोरीसह अन्य गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रायफलसारखे शस्त्र आढळल्याने पोलिस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाण्याला भेट देत माहिती घेतली. घटनेची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातही वाऱ्याच्या वेगाने पसरली. प्राथमिक चौकशीत रायफल परराज्यातून आणल्याचे आरोपी सांगत आहेत. रायफलचा उपयोग काय, ती कशासाठी आणली, यापूर्वीही शस्त्र आणले काय, ते तयार कसे झाले याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत. तूर्तास लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध आर्म ऍक्‍टसह अन्य गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली आहे.

Web Title: three arrested with arms