मालगाडीचे तीन इंजिन घसरले

File photo
File photo

मालगाडीचे तीन इंजिन घसरले
नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्‍विपमेंट) तारेला घर्षण होऊन रेल्वेगाडीला वीजपुरवठा करणारा पेंटोही तुटला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास नागपूर विभागातील मरामझरी रेल्वेस्थानकाजवळ घडली.
या घटनेमुळे खळबळ उडाली. हा मार्ग मोकळा होईपर्यंत प्रवासी गाड्यांना बैतुल आणि आमला रेल्वेस्थानकावर थांबवून ठेवण्यात आले होते. माहिती मिळताच आरपीएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपनिरिक्षक दिलीपकुमार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मदत केली. रात्री उशिरापर्यंत दिलीपकुमार घटनास्थळीच होते. नागपूर विभागातील मरामझरी हा घाट चढाईचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून मालगाडी घेऊन जाताना अतिरिक्‍त इंजिन जोडले जाते. यामुळे मालगाडी सहज चढ्या मार्गाने निघते. या मार्गाने कोळसा भरून मालगाडी जात होती. घाट सेक्‍शन असल्याने मालगाडीला अन्य एक इंजिन जोडण्यात आले. गाडी पुढे जात असतानाच अचानक मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन रुळावरून घसरले. या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी, नागपूरहून निघालेल्या अनेक गाड्यांना थांबवून ठेवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आमला आणि इटारसीवरून "ऍक्‍सिडेंट रिलिफ व्हॅन' सायंकाळी घटनास्थळी पोहोचल्या. घटनेची माहिती नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत इंजिन व वॅगन रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले. त्यामुळे जयपूर व जीटी या दोन गाड्यांना बैतुल आणि आमला रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले. याशिवाय गोंडवाना, तेलंगणा, तमिळनाडू, संपर्कक्रांती एक्‍स्प्रेसला बैतुल स्थानकावर थांबविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com