उष्माघाताचे तीन बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

नागपूर - विदर्भातील उन्हाची तीव्र लाट दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असून,  सोमवारी पाऱ्याने नागपूर आणि यवतमाळ येथे गेल्या दशकातील नवा उच्चांक गाठला आहे. उन्ह सहन न झाल्याने सोमवारी नागपुरात तिघांना प्राण गमवावा लागला. उल्लेखनीय म्हणजे तिघेही  सदर परिसरात मृतावस्थेत आढळले. मीठा नीम येथे सकाळी दहाच्या सुमारास ५० ते ५५ वयोगटातील अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळला. सदर येथील आयकर भवनासमोरही संजय तळवलकर (वय ४५) तर व्हीसीए चौकात सुभाष दुपारे (वय ६०) मृतावस्थेत आढळले. तिघेही उष्माघाताने दगावले असावेत, अशी शंका पोलिसांना आहे. 

गेल्या आठवड्यापासून संपूर्ण विदर्भ उन्हाच्या तीव्र लाटेचा सामना करीत आहे. सोमवारी उन्हाचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांना बसला. नागपुरात पाऱ्याने ४५.६ अंश सेल्सिअस हा दशकातील नवा विक्रम प्रस्थापित केला. गतवर्षी १८ एप्रिल रोजी तापमान ४५.५ अंशांवर गेले होते. यवतमाळ येथेही ४४ अंश सेल्सिअस  इतकी दशकातील विक्रमी तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरवासींसाठी यंदाचा उन्हाळा अग्निपरीक्षेचा ठरतो आहे. सोमवारी येथे कमाल तापमान ४६.८ अंशांवर गेले, जे विदर्भ व राज्यातच नव्हे, संपूर्ण देशात सर्वाधिक तापमान ठरले.  

ब्रह्मपुरी येथेही पारा ४६ अंशांवर कायम राहिला. याशिवाय वर्धा (४५.० अंश सेल्सिअस), गडचिरोली (४४.८ अंश सेल्सिअस, अकोला (४४.० अंश सेल्सिअस) आणि अमरावती (४४.२ अंश सेल्सिअस) येथेही उष्णलाटेचा प्रभाव अधिक जाणवला. मध्य भारतातील कोरडे हवामान लक्षात घेता विदर्भात उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

पाकिस्तानलाही उन्हाचा तडाखा 
उन्हाच्या तडाख्याने पाकिस्तानही प्रचंड त्रस्त आहे. सोमवारी जगात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या पहिल्या पाच शहरांमध्ये पाकिस्तानची चार शहरे आहेत. जगात सर्वाधिक तापमानाची नोंद बवाबशाह येथे (५०.३ अंश सेल्सिअस) करण्यात आली. याशिवाय जाकोबाबाद येथे ५०.१ अंश सेल्सिअस, पाड इदान येथे ४९.१ अंश सेल्सिअस आणि रोहरी येथे ४८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर (४६.८ अंश सेल्सिअस) पाचव्या स्थानावर राहिले.

Web Title: three death by sunstroke