मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू

नागपूर : अपघातानंतर घटनास्थळावर जमलेला जमाव.
नागपूर : अपघातानंतर घटनास्थळावर जमलेला जमाव.

टेकाडी (जि. नागपूर) : कामठी ओसीएम कोळसा खाण परिसरातील एमआयडीसी अधिग्रहित जागेवर असलेल्या मातीचे अवैध उत्खनन करताना तीन मजुरांचा दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. कन्हैया रामकेवल हरजन (वय 28), गंगाप्रसाद शंकर जलहारे (वय 35), शिवकुमार नागमन मनहारे (वय 40, तिघेही रा. खदान क्रमांक 4, बांधा दफाई, कांद्री) अशी मृतांची नावे आहेत.
वेकोलि परिसरातील रिकाम्या भूखंडांवरून अनेक वर्षांपासून मातीचे अवैध उत्खनन सुरू आहे. कोळसा आणि मातीची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. शुक्रवारी सकाळी ट्रॅक्‍टर घेऊन पाच मजूर माती काढण्यासाठी गेले होते. माती भरल्यानंतर दोन मजूर ट्रॅक्‍टरसह परत आले. तर अंदाजे तीन फूट खोल खड्ड्यात तिन्ही मजूर ट्रॅक्‍टरची वाट पाहत विश्रांती करीत होते. याचदरम्यान अचानक मातीचा ढिगारा खचला. तिघेही त्याखाली दबल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती ट्रॅक्‍टरचालकाने मालकाला दिल्यानंतर ती वेकोलि प्रशासनाकडेही गेली. लगेचच जेसीबी लावून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मजूर दबल्याची माहिती पोहोचताच नागरिकांनी तेथे धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी पुज्जलवार, ठाणेदार काळे यांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जमावाने मृतदेह उचलण्यास नकार देत वेकोलि प्रशासनावर आरोप केले. जिल्हा परिषद सदस्य व एचएमएस कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार यादव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी मध्यस्थी करून तातडीच्या मदतीची व्यवस्था केली. ट्रॅक्‍टरचालक व मालकाचा शोध कन्हान पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने कन्हान पोलिस आणि महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
भीतीपोटी विसरला माणुसकी
मजुरांचा दबून मृत्यू झाला त्यावेळी ट्रॅक्‍टर माती भरण्यासाठी येत होता. मात्र, मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली मजूर दबल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रॅक्‍टरसह पळ काढला. यानंतर घटनेची माहिती ट्रॅक्‍टरच्या मालकाला देण्यात आली. अपघाताची माहिती कळताच मालकही पसार झाला. कारवाईच्या भीतीपोटी माणुसकीचा धर्म सोडून पळ काढणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकावर रोष व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com