वाहन उलटून तीन भक्‍तांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : देवी विसर्जन करून घरी परतत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात चालकासह तीन देवीभक्‍तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा युवक गंभीर जखमी असून जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर झाला. 

नागपूर : देवी विसर्जन करून घरी परतत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात चालकासह तीन देवीभक्‍तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा युवक गंभीर जखमी असून जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर झाला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वरमधील खरबी चौकात सार्वजनिक देवी महोत्सव साजरा करण्यात येतो. या मंडळाने मोठ्या देखाव्यासह देवीच्या मूर्तीची स्थापना केली. दसऱ्याच्या दिवशी मध्यरात्रीला देवी विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते बोलेरो पिकअप वाहनाने (एमएच 31,डीएस-975) उमरेड रोड पाचगाव खदानमध्ये गेले होते. वाजतगाजत देवीला निरोप दिल्यानंतर मंडळाचे जवळपास 20 कार्यकर्ते रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घरी परतत होते. विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर वळण घेत असताना वाहनावरील चालक मंगेशचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन वेगात असतानाच उलटले. झालेल्या अपघातात महेश किशोर सोनटक्‍के (वय 17, रा. मानसी ले-आउट), शंकर विनोद धुर्वे (वय 18) आणि चालक मंगेश नानोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवी सोनवणे (वय 35), किशोर सोनटक्‍के (वय 45), बाबूसिंग बैस (वय 50), संदीप उईके (वय 18) दीपक उईके (वय 35) आणि निकेश उईके (वय 19) हे सहा जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी लगेच धाव घेतली. काहींनी 108 क्रमांकावर फोन करून ऍम्बुलन्सला बोलावले. मात्र, ऍम्बुलन्स तब्बल दीड तास उशिरा पोहचली. तोपर्यंत एका जखम घटनास्थळावरच मरण पावला. माहिती मिळताच हुडकेश्‍वरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले मोठ्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. लगेच गंभीर जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी फिर्यादी नरेंद्र भोजराज ढोमणे (वय 35, मानसी ले-आउट) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयात दाखल काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three died in accident