विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

नागपूर - शहरातील अत्यंत पॉश अशा एम्प्रेस सिटीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत पाण्याची मोटर काढण्यासाठी उतरलेल्या प्लंबरचा श्‍वास कोंडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य दोन सहकारी मागोमाग उतरले. या तिघांचाही विहिरीतच गुदमरून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.

नागपूर - शहरातील अत्यंत पॉश अशा एम्प्रेस सिटीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या विहिरीत पाण्याची मोटर काढण्यासाठी उतरलेल्या प्लंबरचा श्‍वास कोंडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य दोन सहकारी मागोमाग उतरले. या तिघांचाही विहिरीतच गुदमरून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.

दीपक गवते (४२, रा. सुगतनगर), चंद्रशेखर बारापात्रे (४०) आणि अजय गारुडी (४३) अशी मृतांची नावे आहेत. तिघांनाही पाणीपुरवठ्याशी संबंधित कामासाठी ठेवण्यात आले होते. सुमारे वर्षभरापासून ते याच ठिकाणी कामाला होते. समीर टाकोने या पर्यवेक्षकाकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. एम्प्रेस सिटीतील इस्कॉन मंदिरमागील इमारतीच्या बेसमेंटमध्ये दोन विहिरी आहेत.

त्यातील मोठी विहीर खोल असून बरेच पाणी आहे, तर दुसरी केवळ १२ फुटांची असल्याने त्यात केवळ दीड फूट पाणी आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने दीपकला विहिरीतून पाण्याचा पंप काढण्याची सूचना केली. पंपाला दोरी बांधण्यासाठी उतरत असताना तिसऱ्याच रिंगवर दीपकचा श्‍वास गुदमरायला लागला आणि काही क्षणातच तो खाली कोसळला.

दीपक पाण्यात तडफडत असल्याचे बघून चंद्रशेखर मदतीला धावला. मात्र, श्‍वास कोंडल्याने तोही तडफडू लागला. हा प्रकार बघून तिथे उपस्थित असलेले घाबरले. समीरही जवळच उभा असलेला जेसीबी आणण्यासाठी गेला. तेवढ्यात कोणताही विचार न करता अजयसुद्धा विहिरीत उतरला. तोही तडफडू लागला. लागलीच घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन जवानांनी घटनास्थळ गाठून प्रारंभी विहिरीत पाण्याचा मारा केला. त्यानंतर तिघांनाही बाहेर काढले. पण, तोवर बराच उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ ठाण्याचे निरीक्षक सुनील गांगुर्डे ताफ्यासह दाखल झाले. तातडीने तिघांनाही मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले.

नेमके कारण गुलदस्त्यात!
विहीर केवळ १२ फूट खोल असल्याने त्यात विषारी वायू जमा होण्याचा धोका अगदीच कमी आहे. मोटार आणि पाण्यात वीज प्रवाहित होऊन शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेम अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.

पत्ते शोधण्यासाठी धावाधाव
घटनेची माहिती मिळताच दीपक गवतेची पत्नी आणि नातेवाईक मेडिकलमध्ये पोहोचले. दीपकच्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून, मुलगा आठवीत आहे. चंद्रशेखर आणि अजयच्या घरचा पत्ता कामाच्या ठिकाणी कुणालाही माहिती नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत घटनेची माहिती पोहोचविण्यासाठी पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, गवतेकडे केवळ पंप सुरू करून नादुरुस्त नळ सुरू करणे एवढीच जबाबदारी होती. कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय त्यांना विहिरीत का उतरविण्यात आले? असा प्रश्‍न दीपकच्या कुटुंबीयांनी केले.

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी पर्यवेक्षकची नियुक्ती करण्यात आली आहे. घटनेनंतर दोन महिला पर्यवेक्षकांसह तिघे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यांच्याकडून प्रारंभी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला. यातून आपसांतच त्यांची बाचाबाचीही झाली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे चंद्रशेखर आणि अजयच्या वास्तव्याबाबत कोणतीही माहिती नव्हती.

 

Web Title: Three died in a cavity in the well