हेही वाचा... बाळाला वाचविण्यासाठी आईने तोडू दिले लचके

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

> महिला पोलिस अधिकाऱ्यांवर तीन श्‍वानांचा हल्ला 
> श्‍वानांच्या मालकावर गुन्हा दाखल 
> तीन वर्षांच्या मुलासह पार्किंगमध्ये असताना हल्ला 
> मुलाला कडेवर घेतल्याने मोठा अनर्थ टळला 

नागपूर : आई ही आईच असते. तिची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. मुलाला जन्म देणे म्हणजे एका आईला दुसरा जन्म घेण्यासारखेच असते. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली असे म्हणतात. कोणत्याही आईकडे बघितले तर हे सत्य असल्याचे दिसून येते. आपल्या मुलाला चांगला व्यक्‍ती घडविण्यासाठी तसेच त्याचे रक्षण करण्यासाठी ती कोणत्याही संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवते. 

डिस्कव्हरी चॅनलवर आपण अनेकदा आईला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीव देताना बघितले आहे. बिबट्या, चिता, वाघ, मगर आदींपासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्यासाठी माकड, हरीण आदींनी आपण जीव दिल्याचे आपण अनेकदा बघितले आहे. चित्रपटातही आपला जीव धोक्‍यात टाकून मुलांला वाचविणाऱ्या आई बघितल्या आहेत. अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. 

तीन वर्षांच्या बाळाला घेऊन घरी जात असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांवर अचानक तीन पाळीव श्‍वानांनी हल्ला केला. माजी आंतरराष्ट्रीय धावपटू असलेल्या या महिला पोलिसाने बाळाला वाचविण्यासाठी श्‍वानांना स्वतःचे लचके तोडू दिले. ही थरारक घटना मनीषनगरात घडकीस आली आहे. डिम्पल नायडू-पवार असे जखमी झालेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे. बेलतरोडी पोलिसांनी श्‍वानांच्या मालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिम्पल नायडू-पवार या नागपूर शहर पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत त्या मनीषनगरातील नवनाथ सोसायटी, तीर्थपॅलेस फ्लॅट नं 102 येथे राहतात. याच इमारतीत कॉंग्रेसचे नेते रजत देशमुखसुद्धा राहतात. त्यांनी तीन रोडविनर प्रजातीचे भले मोठे श्‍वान पाळले आहेत. गेल्या रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डिम्पल नायडू आपल्या तीन वर्षांचा मुलगा कुंजसह पार्किंगमध्ये आल्या होत्या. त्यावेळी रजत देशमुख यांच्या मालकीच्या तीन श्‍वानांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 

डिम्पल यांनी लगेच मुलगा कुंजला कडेवर घेतले आणि श्‍वानांचा सामना केला. श्‍वानांनी बाळावर झडप घालण्याचा प्रयत्न केला; मात्र डिम्पल यांनी प्राणाची बाजी लावत मुलाला सांभाळले. त्यामुळे तिन्ही श्‍वानांनी डिम्पल यांचे लचके तोडायला सुरुवात केली. मात्र, श्‍वानांची उंची आणि आक्रमकता पाहता कुणीही वाचविण्यास धजावले नाही. त्यामुळे डिम्पल यांनी रक्‍ताने माखलेल्या अवस्थेत स्वतःची कशीबशी सुटका केली आणि पळ काढला. तेवढ्यात डिम्पल यांचे पती राजेंद्र पवार हे धावत आले. त्यांनी लगेच डिम्पलला रुग्णालयात दाखल केले. डिम्पल यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून श्‍वानांचे मालक रजत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

मोठा अनर्थ टळला

डिम्पल या तीन वर्षांच्या कुंजचे बोट धरून खाली आल्या, त्यावेळी तिप्ही श्‍वानांनी कुंज आणि डिम्पल यांच्यावर हल्ला चढविला. श्‍वांनाच्या तावडीतून बाळाला वाचविण्यासाठी डिम्पलने स्वतःला सामोरे केले. त्यामुळे श्‍वानांनी डिम्पल यांचे लचके तोडले. डिम्पल यांनी बाळाला खांद्यावर घेतले आणि मदतीसाठी आरडाओरड केली. लगेच त्यांचे पती मदतीस धावल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

Image may contain: 2 people, indoor
डिम्पल नायडू

कोण आहेत डिम्पल

डिम्पल नायडू या मूळच्या गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी राष्ट्रीय धावपटू म्हणून त्यांनी ख्यात प्राप्त केली. "स्पेशल केस'मध्ये त्यांना वयाच्या 17व्या वर्षी स्पोर्ट कोट्यातून पोलिस खात्यात नोकरीत घेण्यात आले. डिम्पल यांनी आतापर्यंत 28 नॅशनल रनिंग स्पर्धेत पोलिस दलाचे नेतृत्व केले आहे. तर दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत "इंडियन पोलिस दल संघाचे' प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी तामिळनाडू कमांडो ट्रेनिंग पूर्ण केले असून, त्यांना तीन वेळा प्रमोशन देण्यात आले. त्यांना पोलिस महासंचालकाचे विशेष सेवेबद्दलही पदक बहाल करण्यात आले आहे, हे विशेष... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three dog attack to female police officer