सालईमेंढ्यात तिघांचा बुडून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नागपूर/हिंगणा - तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलावात शहरातील भांडे प्लॉट, चमारपुरातील तिघांचा रविवारी दुपारी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मैत्रीदिन साजरा  करण्यास गेलेल्या दहा जणांपैकी सागर सुरेश जांभूळकर (वय १७), बंटी प्रेमलाल निर्मल (वय १५), प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धार्थ सिडाम (वय १७) या तिघांवर काळाने घाला घातला. या तिघांचीही घरे आजूबाजूला असून चमारपुरा वस्तीवर शोककळा पसरली. 

नागपूर/हिंगणा - तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलावात शहरातील भांडे प्लॉट, चमारपुरातील तिघांचा रविवारी दुपारी चारच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. मैत्रीदिन साजरा  करण्यास गेलेल्या दहा जणांपैकी सागर सुरेश जांभूळकर (वय १७), बंटी प्रेमलाल निर्मल (वय १५), प्रथमेश ऊर्फ गुड्डू सिद्धार्थ सिडाम (वय १७) या तिघांवर काळाने घाला घातला. या तिघांचीही घरे आजूबाजूला असून चमारपुरा वस्तीवर शोककळा पसरली. 

चमारपुऱ्यातील मृत सागरच्या घरी सर्व मित्र एकत्र आले. घरी या मित्रांनी मैत्रीदिनानिमित्त आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला.  दुपारी सर्वच जण तेलगावनजीकच्या सालईमेंढा तलाव परिसरात गेले. यातील तिघांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. दोघे खोल पाण्यात गेले, ते पाण्यात बुडू लागल्याने त्यांना मदतीसाठी तिसरा मित्रही गेला. मात्र, यात तिघांचाही बुडून मृत्यू झाला. काठावर असलेल्या अन्य मित्रांना त्यांची मदत करता आली नाही. त्यांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. पोलिस व अग्निशमन  दलाचे पथक घटनास्थळावर दाखल झाले. सायंकाळी अंधार होईस्तोवर बंटी व प्रथमेशचे  मृतदेह सापडले होते. मात्र, रात्र झाल्यामुळे अग्निशमनच्या जवानांनी शोधमोहीम थांबविली. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, इतर मित्रांमुळे यांच्या घटनेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली अन्‌ चमारपुऱ्यावर शोककळा पसरली. घरात माहिती होताच तिन्ही कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. काही वेळातच परिसरात घटनेची माहिती पसरल्याने तिघांच्याही घरांकडे नागरिकांनी धाव घेतली. रात्रीपर्यंत नातेवाइकही पोहोचले. इतर विशाल भगत (१६), ओम नागोसे (१७), स्वप्नील वडमे (१७), शुभम केदार (१७), रितेश भालेकर (१७) हे मित्र बचावले. त्यांनीच घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

आई म्हणाली, कशाला आले, काय झाले? 
सागरच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. सागरबाबत मात्र आई वनिता यांना कुणीही काहीही सांगितले नाही. त्यामुळे घरी येणाऱ्या नातेवाइक, परिसरातील नागरिकांना त्या कशाला आले, काय झाले? असे प्रश्‍न विचारत होत्या. त्यामुळे नातेवाइकही काही वेळ स्तब्ध झाले.

मैत्रीदिनाचा बेत जिवावर बेतला
मैत्रीदिन बाहेर साजरा करण्याचा बेतच या तिघांच्या जिवावर बेतला. मृत सागर हा दहावी नापास असून खासगी रुग्णालयात काम करून टाइल्सचे काम करणाऱ्या वडिलांना हातभार लावत होता. नुकताच त्याने गुटखा तयार करण्याची मशीन खरेदी करून पानटपरी थाटली होती. त्याची आई गृहिणी असून त्याला दहा वर्षांचा लहान भाऊ आहे. बंटी निर्मल हा किराणा दुकानात काम करीत होता तर प्रथमेश सिडाम हा बारावीचा विद्यार्थी होता. 

Web Title: Three drowned in salaimendha lake

टॅग्स