तीन शेतकरी भावंडांचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

यवतमाळ - शेतीची वाटणी आणि ताबा यामुळे निर्माण झालेल्या वादातून शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतीक्षालयात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. विष घेणाऱ्या उमेश दत्तासिंग गौतम (वय 28), आशिष अरुण गौतम (वय 32) व कुंदनसिंग रामचरणसिंग गौतम (सर्व रा. डोल्हारी, ता. दारव्हा) यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

दारव्हा तालुक्‍यातील डोल्हारी (शेंद्री) गावात सरस्वतीबाई बैस यांची पाच हेक्‍टर शेती होती. 2004 मध्ये झालेल्या वाटणीत ही शेती गंगाबाई ठाकूर, रवी जनकवार, अमोल ठाकूर यांच्या नावे करण्यात आली. मात्र, उमेश गौतम, आशिष गौतम, सोनू गौतम व कुंदनसिंह गौतम यांनी या जमिनीवर हक्क सांगून न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासून 10 ऑगस्ट 2014 रोजी गंगाबाई ठाकूर, रवी जनकवार व अमोल ठाकूर यांच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने शेतीचा ताबा या तिघांकडे देण्याचे नमूद केले होते. 

ऑगस्ट 2015 मध्ये दारव्हाच्या पोलिस पथकाने गावात जाऊन शेतीचा ताबा गंगाबाई व इतर दोघांना देण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी आशिष गौतम यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. उमेश गौतम, आशिष गौतम व कुंदनसिंग गौतम आज सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. त्यांनी पोलिस कारवाई थांबावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भेट झाली नाही. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच मदत मिळत नसल्याचे पाहून तिघेही व्यथित झाले. त्यातूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या दालनाबाहेरील प्रतीक्षालयात त्यांनी विष घेतले. 

विभागीय आयुक्तांकडे अहवाल 
या प्रकरणाच्या घटनाक्रमासह सविस्तर माहितीचा अहवाल प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. यापूर्वीदेखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Three farmers' suicide attempt