रानमांजराच्या शिकाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

गडचिरोली : रानमांजराची शिकार करून विकायला नेणाऱ्या तीन शिकाऱ्यांना गुरुवारी (ता. 16) सायंकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. पितांबर ऋषी सुरपाम, दिवाकर पत्रू मेश्राम, सोमेश्‍वर दामोदर कांबळे आणि दामोदर देवाजी शेरकी अशी त्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वनपरिक्षेत्राधिकारी कैलुके गुरुवारी पुलखल, मुडझा परिसरात वन्यजीवविषयक पाहणी करीत असताना मुडझा येथे काही व्यक्‍ती बांबूचे वास्ते (बांबूचे कोंब) विकताना आढळून आले. कैलुके व इतर या व्यक्‍तींकडे गेले असता वास्ते तिथेच टाकून ते पळून गेले. वास्त्यांची पाहणी केली असता प्लास्टिकच्या एका पोत्यात मृत रानमांजर आढळून आले. घटनास्थळी दोन व्यक्‍ती जवळच आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन विचारले असता ते ग्राहक असल्याचे सांगितले. मात्र, आरोपींपैकी एकाला ओळखत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी एका आरोपीचे नाव सांगितल्यानंतर कैलुके यांनी सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात तपास करून पितांबर सुरपाम, दिवाकर मेश्राम, सोमेश्‍वर कांबळे आणि दामोदर शेरकी यांना अटक केली.
तीन ते सात वर्षांची शिक्षा
भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 मधील अनुसूची दोन अंतर्गत रानमांजर हा प्राणी संरक्षित आहे. या प्राण्याची शिकार केल्यास कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिवाय 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच पुन्हा असा गुन्हा करताना आढळल्यास 25 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

Web Title: three hunter arrested