देहविक्रीसाठी तीन युवतींची राजस्थानात विक्री

देहविक्रीसाठी तीन युवतींची राजस्थानात विक्री

नागपूर- नागपुरातील तीन युवतींना देहव्यापारासाठी राजस्थानमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली, तसेच युवतींची सुटक केली. नुरजहा शेख कलीम (33, रा. गुलशननगर, कळमना) व रतन बिरमचंद मिना (33, रा. झालावाड, राजस्थान) यांना अटक केली असून, तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

पीडित 20 ते 24 वयोगटातील असून, कळमना, इमामवाडा व नंदनवन परिसरात राहतात. कळमन्यात राहणाऱ्या युवतीची नुरजहा शेख कलीम हिच्याशी ओळख झाली. तिने राजस्थानमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी दोन युवतींना शोधण्यास सांगितले. त्यामुळे तिने दोन मैत्रिणींना नोकरी लावून देणार असल्याचे सांगितले. तिन्ही युवती नुरजहासोबत राजस्थानला जायला तयार झाल्या. 
नुरजहा हिने दलाल राजू ऊर्फ आत्माराम पन्नालाल रॉय (34, रा. वनदेवी चौक, यशोधरानगर) व हसन कुरेशी शेख (40) यांना युवतींना चांगले कपडे, मेकअप किट्‌स आणि अन्य खर्चासाठी पैसे देण्यास सांगितले.

तिघांनी राजस्थानशी संपर्कात असलेला दलाल विरम मिना याला तीन मुली सेक्‍स रॅकेटसाठी विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याने लगेच युवतींचे फोटो पाठविण्यास सांगितले. फोटो मिळताच राजस्थानमधील मुख्य दलाल रतन बिरमचंद मिना (33, रा. झालावाड, राजस्थान) हिला पैशाची व्यवस्था करण्यास सांगितले. 
23 ऑक्‍टोबरला नागपुरातील तिन्ही दलालांना युवतीसह राजस्थानला बोलविले. चार नोव्हेंबरपर्यंत रतन हिच्या अड्ड्यावर युवतींना ठेवले. युवतींना देहव्यापारासाठी विक्री केल्याची कल्पना आली. त्यांनी सुटका करण्यासाठी धडपड केली. मात्र, ती व्यर्थ गेली. युवतींना देशभरात सेक्‍स रॅकेटमध्ये ढकलल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

असा झाला पर्दाफाश 
राजू रॉय व हसन शेख हे दोघे गांजा तस्कर आहेत. सोबत ते देहव्यापारासाठी मुलींना आंबटशौकिनांपर्यंत पोहोचवितात. भोपाळ रेल्वेस्थानकावर दोघांना गांजा तस्करी करताना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. त्यांना खाक्‍या दाखवताच तीन मुलींची देहव्यापारासाठी विक्री केल्याची कबुली दिली. मध्य प्रदेश पोलिसांनी यशोधरानगर पोलिसांशी संपर्क करून आरोपींना ताब्यात दिले. 

मुलींची देशभरात विक्री 
रतन मिना ही राजस्थानमधील मोठी दलाल असून, देशभरातील मुलींना देहव्यापारासाठी विकत घेते. वयाच्या आठव्या वर्षापासून ते 40 वर्षांपर्यंतच्या मुली आणि महिलांची 40 हजार ते सहा लाखांपर्यंत ती बोली लावते. विकत घेतलेल्या मुलींना कोलकाता, चेन्नई, बांगलादेश, नेपाळ या देशात देहव्यापार करण्यासाठी पाठवीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com