जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट प्रकरणात आणखी तिघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

गडचिरोली : जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक झाली आहे. सोमनाथ दलसाय मडावी (वय 38), किसन सीताराम हिडामी (वय 42), सकरू रामसाय गोटा (वय 35) (तिघेही, रा. लवारी, ता. कुरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.

गडचिरोली : जांभूळखेडा भूसुरुंग स्फोट प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक झाली आहे. सोमनाथ दलसाय मडावी (वय 38), किसन सीताराम हिडामी (वय 42), सकरू रामसाय गोटा (वय 35) (तिघेही, रा. लवारी, ता. कुरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.
नक्षलवाद्यांनी 1 मे 2019 रोजी कुरखेडापासून 6 किमी अंतरावरील जांभूळखेडा ते पुराडा मार्गावर भूसुरुंगस्फोट घडवून आणला होता. या प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांची दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य तसेच वेस्टर्न सब झोनल प्रमुख उप्पगुंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का (रा. कोडापावनुरू गलावरम मंडल, जि. कृष्णा, आंध्र प्रदेश) व तिचा पती सत्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा याला अटक केली होती.
19 जून रोजी गडचिरोली पोलिस दलातील तपास पथकाने तेलंगणा राज्यातून लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राइव्ह व इतर संशयास्पद साहित्य जप्त केले होते. इतर पुराव्यांआधारे गडचिरोली पोलिस दलाने कुरखेडा तालुक्‍यातील लवारी येथील दिलीप श्रीराम हिडामी (वय 22), परसराम मंगाराम तुलावी (वय 28) यांना 13 जून रोजी अटक करून पोलिस कोठडीत रवानगी केली होती. त्यांची 24 जून रोजी पोलिस कोठडी संपल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. न्यायालयाने अधिक तपासासाठी दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत 10 दिवसांची वाढ केली आहे. पोलिस दलाने 23 जून रोजी पुन्हा तीन आरोपी सोमनाथ दलसाय मडावी, किसन सीताराम हिडामी, सकरू रामसाय गोटा यांना अटक केली आहे. तीनही आरोपींना 24 जूनला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three more accused in the Jambhulkheda Bhoosurung blast case