24 तासांत तीन खून!

file photo
file photo

नागपूर : उपराजधानीतील बॉबी सरदार हत्याकांडावरील शाई वाळते न वाळते तोच गेल्या 24 तासांत तीन हत्याकांड उघडकीस आले. शहरातील हत्याकांडांची संख्या पाहता उपराजधानी पुन्हा क्राइम सिटीकडे वाटचाल करताना दिसत आहे. कळमना, गोळीबार चौक आणि लकडगंज परिसरात हत्याकांड उघडकीस आले.
लकडगंजमधील घटनेत मित्रानेच मित्राचा चाकूने वार करून खून केला. शुभम भीमराव वासनिक (वय 22, रा. गंगाबाई घाट, स्विपर कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम आणि 17 वर्षांचा आरोपी यश (बदललेले नाव) दोघेही मित्र होते. शुभमचे गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी आईवडील आजारपणामुळे मृत पावले. तेव्हापासून तो भाऊ आणि बहिणीसह गंगाबाई घाट परिसरात किरायाने राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्याला नेहमी बाहेर राहण्याची सवय होती. तर यशचे वडील मृत पावले असून तो आईसह राहतो. आई धुणीभांडी करते. गेल्या तीन वर्षांपासून दोघांची घट्‌ट मैत्री आहे. शनिवारी रात्री नऊला शुभम आणि यश हे मिठानीम दर्ग्याजवळ गेले. तेथून घरी परतताना दोघांनीही दारू ढोसली. त्यानंतर दोघेही शुभमच्या घरी गेले. शुभमने एकट्याने जेवण केले, तर यश बाजूने बसला होता. जेवण झाल्यानंतर दोघेही टेलिफोन एक्‍चेंज चौकात आले. अजमेरा टायर्स या दुकानाच्या शेडखाली दोघांनीही झोपण्याची व्यवस्था केली. दरम्यान, शुभमने घरी जेऊ न घातल्यामुळे यशने त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र, यशच्या मनात जेवण न दिल्याचा राग होता. त्याने शुभम झोपेत असताना त्याच्या पोटात चाकू खुपसला आणि थेट घर गाठले. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात प्रकार आला. लकडगंज पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटविली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून यशला अटक केली.
सीसीटीव्हीवरून उलगडा
लकडगंज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी यशचा चेहरा दिसत होता. वस्तीत त्याचे फोटो दाखवताच यशचे घर पोलिसांना सांगितले. यशला आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
अशी पटली ओळख
मृत युवकाची ओळख पटत नव्हती. मृताच्या हातावर शुभम नाव गोंदलेले होते. पोलिसांनी हाताचा फोटो काढून वस्तीतील नागरिकांना दाखवला. तर काहींनी शुभम वासनिक अशी मृताची ओळख सांगितली. पोलिसांनी शुभमची बहीण दुर्गा हिला घटनास्थळावर आणून ओळख पटविली.
मित्रानेच केला "गेम'
भांडेवाडी परिसरात दुसरे हत्याकांड घडले. चंदन ऊर्फ कालू राजकुमार शर्मा (22, रा. गृहलक्ष्मीनगर, पारडी-भांडेवाडी) या तरुणाचा मृतदेह शेजाऱ्यांना घरात पडलेला दिसला. तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत झालेल्या तरुणाचे आईवडील हे त्याच्या भावासह चंद्रपूरला गेल्याचे पोलिसांना कळाले. शनिवारी रात्री घरी कुणीही नसल्यामुळे कालूचे काही मित्र दारू पिण्यासाठी घरी आले होते. दारू पिल्यानंतर मित्रांमध्ये वाद झाला. त्या वादातून मित्रांनी कालूचा गळा चिरून खून केला आणि पळून गेले. त्यामुळे त्याच्या काही मित्रांना ताब्यात घेऊनही पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत विचारपूस सुरू होती.
गोळीबार चौकात खून
रात्री साडेआठला अंकित रामू धकाते (वय 21, रा. गोळीबार चौक) या युवकाचा पाच युवकांनी तलवार आणि चाकूने वार करून खून केला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाले असून आरोपी फरार आहेत. आरोपी आणि अंकित धकाते यांच्यात गेल्या एका महिन्यापूर्वी वाद झाला होता. तेव्हा दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. संधी मिळताच रविवारी रात्री साडेआठला अंकित गोळीबार चौकातील पानठेल्यावर उभा होता. दरम्यान, आरोपी रोशन चिचघरे, अंकुश चिचघरे, सचिन चिचघरे, नितीन निमजे ऊर्फ मछली आणि राहुल मौंदेकर यांनी अंकितवर तलवारीने वार करून खून केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com