विदर्भात उष्माघाताने घेतला तिघांचा बळी

file photo
file photo

नागपूर : विदर्भात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाला. यात अमरावती येथील वृद्धाचा, यवतमाळ येथे महिलेचा; तर भंडाऱ्यात एका युवकाचा मृत्यू झाला.
नेरपिंगळाई (जि. अमरावती) : येथील वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. सात) दुपारी 3 वाजता ही घटना घडली. शरद श्‍यामराव चुटके (वय 65), असे या वृद्धाचे नाव आहे.
शरद चुटके हे विविध कार्यकारी संस्थेचे माजी कर्मचारी होते. मोर्शी येथे पेन्शन घेण्याकरिता गेले असता परत येताना ते नेरपिंगळाई येथे येण्याकरिता लेहेगाव चौकीवर उतरले. परंतु, रस्त्याचे काम सुरू असल्याने बस विरुद्ध दिशेने थांबली. त्यामुळे नेरपिंगळाईच्या बसमध्ये बसण्याऐवजी ते पुन्हा मोर्शीच्या बसमध्ये बसले. बसमध्ये वाहकाने तिकीटची मागणी केली असता त्यांनी नेरपिंगळाईची तिकीट मागितली. वाहकाने त्यांना तुमी चुकीच्या गाडीत बसले असून उतरा, असे सांगून शिरखेड ते निंभीच्या मधात रणरणत्या उन्हात उतरवून दिले. पुन्हा बस पकडण्यासाठी त्यांनी निंभीकडे पायी जाण्यास सुरुवात केली असता चारघड नदीच्या पुलावर सकाळपासून नाश्‍ता व जेवण न केल्याने उष्माघाताने चक्कर येऊन पडले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
कळंब (जि. यवतमाळ) : शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. सात) दुपारी दोनला राजेश वाघमारे यांच्या शेतात घडली. गिरजा सदाशिव वड्डे (वय 65, रा. हलबीपुरा, कळंब) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला वाघमारे यांच्या शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. मृताच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडं व बराच मोठा आप्त परिवार आहे.
भंडारा : साकोली येथे शुक्रवारी युवकाचा मृतदेह आढळून आला. धनराज शिवचरण द्रुगकर (वय 35, रा. आमगाव, जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या लहरीबाबा मठ देवस्थानासमोर नालीच्या स्लॅबवर झोपलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. देवस्थानाचे पुजारी किशोर तिडके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com