अवनीच्या बछड्याला पिंजऱ्यात बसून पकडणार

Tiger
Tiger

यवतमाळ - टी-वन अवनी अर्थात नरभक्षक वाघिणीच्या नर बछड्याला पकडण्याची  मोहीम पुन्हा नव्याने वनविभागाने हाती घेतली आहे. वनविभागाचे तज्ज्ञ पशुसंवर्धन अधिकारी थेट पिंजऱ्यात बसून या बछड्याला बेशुद्ध करून जेरबंद करणार आहेत, अशी ही नवीन रणनीती आहे.

एकूण १३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला दोन नोव्हेंबर २०१८ ला शार्पशूटर नवाब शापत अली खान यांचा पुत्र असगर अली खान याने बंदुकीची गोळी घालून ठार केले होते. त्यानंतर अवनी वाघिणीचे दोन लहान बछडे अंजी परिसरात ६५५ कंपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. तिथेच वनविभागाने साडेतीन किलोमीटर तारेची व जाळीचे कुंपण करून मध्य प्रदेशातील चार हत्तीच्या साहाय्याने बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम राबविली. त्यात २२ डिसेंबरला मादी बछड्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, दुसऱ्या दिवशी नर बछडा त्या भागातून निसटून गेला. हा नर बछडा १५३ कंपार्टमेंट असलेल्या भूलगड परिसरात वास्तव्यास आल्याने ही मोहीम थांबली  होती. आता अवनीचा बछडा भूलगड परिसरात वास्तव्यास आहे.

वन विभागाने त्या वाघाच्या बछड्याला जेरबंद करण्यासाठी कुठलेही तार-कुंपण न करता तिथे बकरी व घोडे बेट्‌स म्हणून ठेवले आहे. तो बछडा तिथेच येऊन त्या बेट्‌सची शिकार करून  जगत आहे. आता वनविभागाने लोखंडी पिंजऱ्याला झाडाचा पालापाचोळा व विविध झाडांच्या फांद्यांनी झाकून आच्छादन केले. त्याच पिंजऱ्यात वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी बसून तिथे नर बछड्याला विशिष्ट अंतरावरून डार्ट करून जेरबंद करणार आहेत. बछड्याला जेरबंद केल्यानंतर त्याला पेंच इथल्या रेस्क्‍यू सेंटरला पाठवलं जाईल, अशी माहिती वनविभागाच्या  सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com