वाघ आला रे...वाघ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

-गावाशेजारीच वाघाची डरकाळी
-शेतमजुरांची घराकडे धाव
-वन कर्मचारी निघाले वाघाचे ठसे शोधण्यासाठी आवाजाच्या दिशेने
-चार गाई, एक गोऱ्हा, एका रोहीची केली शिकार

घाटबोरी (जि.बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील घाटबोरी या डोंगरमाथ्यावर वसलेले गाव असून, पावसामुळे शेतातील कामे अर्धवट असल्याने, शेतकऱ्यांसह शेतमजूर शेतात कामगिरी करत आहे. अशातच यवतमाळच्या टिपरेश्वर अभयारण्यातून भटकंती करत पट्टेदार वाघाने घाटबोरी वनपरिक्षेत्रात येऊन चार गाई, एक गोऱ्हा, एका रोहीची शिकार केली आहे. (ता.13) दुपारी 12 वाजता घाटबोरी वनविभाग कार्यालयापासून एक हजार फुटावर वाघाने गावाशेजारी डरकाळी फोडल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी गावाकडे धाव घेतली.

परिसरात वाघ असल्याच्या वृत्ताला आज (ता.13) दुपारी डरकाळीमुळे शाश्‍वती मिळाली असून, सर्वत्र वाघ आला रे.. वाघ आला अशी चर्चा आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रल्हाद तोंडीलायता, वनपाल संदीप परिहार व यांची पथकाने वाघाच्या डरकाळीच्या दिशेने पाऊल खुणा शोधत शोधत तीन तास मोहीम राबवली. परंतु, शेतामध्ये तूर व गवत वाढलेले असल्याने कुठेही वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. 

वाघाच्या डरकाळीची वार्ता शेजारच्या अकोला जिल्हाअंतर्गत पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एस.डी. नालींदे यांना समजताच त्यांनी आलेगाव वनपरिक्षेत्रामधील एक पथक घाटबोरी वनविभागाच्या हद्दीत पट्टेदार वाघाच्या दिशेने पेट्रोलिंगसाठी पाठवले होते. घाटबोरी वनविभागातील वनपरिक्षेत्रात परिसरातील शिवारात शेतकऱ्यांना वाघ काहीना दिसल्यामुळे तर काही नागरिक डरकाळीच्या आवाजाने भयभीत झाले आहे. 

परिणामी, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात सावधानता बाळगावी, शिवारात एकट्याने जाऊ नये असे सांगितले आहे. वाघाच्या पंजाचे ठसे दोन दिवसाअगोदर वनपाल श्री. बोबडे यांनी पाहिले होते. ही बाब ताजी असताना घाटबोरी गावाशेजारी येथील शेतकरी श्री. दोडेवार यांच्या शेतात मजूर हा शेतकाम करीत असताना त्यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. त्यामुळे ते घाबरून गावात धावत पळत आले. 

ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रल्हाद तोंडीलायता यांनी वनकर्मचारी यांना आस-पासच्या परिसरात दवंडी देण्याचे सांगितले की, गावात दवंडीद्वारे ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आल्या. आता शिवारात वाघ दिसल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडली.

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील परिसरात दोन दिवसा अगोदर गाय, गोऱ्हा, रोही याची शिकार वाघाने केली आहे. असे शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करून खातरजमा झाले. वाघाचे पाऊल ठसे 8 नोव्हेंबरला आढळून आले. त्यामुळे ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना कळवली आहे. घाटबोरी गावाशेजारी वाघाने डरकाळी फोडल्याने आस-पासच्या शेतामधील शेतकरी भयभीत होऊन घराच्या दिशेने धावत-पळत आले असे समजले. ज्यांना वाघाच्या पायाचे ठसे दिसताच तत्काळ वनविभागाचे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी व सावधानता बाळगावी.
- पी. आर. तोंडीलायता, वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tiger came ... the tiger