गाळात फसून वाघिणीचा मृत्यू

Tiger
Tiger

देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.  

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त घालत असताना वनपाल जीवन पवार व वनरक्षकांना एक प्रौढ वाघीण गाळात रुतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती वनपाल पवार यांनी वरिष्ठांना दिली. मृत वाघिणीच्या ५०० मीटर परिघामध्ये कोणतीही अवैध बाब आढळून आली नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. मृत वाघिणीचे दोन्ही पाय खोल गाळात रुतून पडले होते, शिवाय तोंड व शरीराचा भागही चिखलात फसला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत वाघीण ही पूर्ण वाढ झालेली असून, तिचा मृत्यू हा दलदलीत अडकल्याने आणि बहुधा श्‍वसनवरोधाने झाला असावा. वाघीण ही घटनास्थळाकडे येत असतानाच्या स्पष्ट खाणाखुणा दिसून आल्या. उपस्थित अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाघिणीची नखे, मिशा, सुळे आणि इतर सर्व अवयव मूळ जागेवर आढळून आले.
 
वाघिणीचे तिच्या सर्व अवयवांसह दहन करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्थान येथील संशोधक आकांक्षा यांनी सदर वाघिणीची ओळख पटवून ती अलीकडेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आल्याची माहिती दिली आहे.

घटनेची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षक, उपसंचालक अमलेंदू पाठक, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, नागपूरचे मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी अनिल दशहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी व डॉ. चेतन पातोंड यांच्यासह डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. विनोद समर्थ, अतुल देवकर घटनास्थळी हजर झाले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com