नागपूरजवळच्या या गावांत का फिरताहेत वाघोबा? ग्रामस्थ भयभीत 

मनोहर घोडसे 
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

सावनेर (जि. नागपूर) : गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यातील वाकी, रायबासा गावांत वाघाने धुमाकूळ घालून जनावरे फस्त करण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांत वाघाने परिसरात पाच बकऱ्यांची शिकार केली आहे.

सावनेर (जि. नागपूर) : गेल्या काही दिवसांपासून तालुक्‍यातील वाकी, रायबासा गावांत वाघाने धुमाकूळ घालून जनावरे फस्त करण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांत वाघाने परिसरात पाच बकऱ्यांची शिकार केली आहे.

Image may contain: plant, outdoor and food
वाघाच्या पाऊलखुणा. 

गावात व शेतशिवारात जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांचा हैदोस वाढताना दिसतो. जंगलालगतच्या शिवारात जंगली जनावरांमुळे शेतपिकांचे नुकसान नित्याचे झाले आहे. मात्र आता वाघांचाही धुमाकूळ सुरू झाला आहे. तालुक्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या वाकी गावात वाघाने काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 
केळवद परिसरातील रायबासा या गावात म्हशीचे रेडकू व गायीच्या वासराची वाघाने शिकार केली. या दोन्ही ठिकाणी अनेकांच्या नजरेपुढे वाघ आला.

वनविभागाने या घटनेची पाहणी केली. वाकी गावातील वाघांच्या पाऊलखुणा तर रायबासा गावात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपुढेच हाकेच्या अंतरावर शिकार झाली. असे असतानाही वनविभागाने अद्यापपर्यंत वाघाला पकडण्यात यश मिळविले नाही. त्यांच्या कारवाईला विलंब लागत असल्याचे येथील सरपंच महोदय सांगतात. मात्र या दोन्ही गावांत वाघांच्या डरकाळ्या व वाघाचा धुमाकूळ बघून गावातील चिमुकले, महिला व शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. शेतशिवारातील कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे वाकी येथील सरपंच अन्नपूर्णा डहाके व रायबासाचे सरपंच सोनू रावसाहेब यांनी वाघाला पकडण्यासाठी ताबडतोब वनविभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. 

Image may contain: outdoor

मिळालेल्या माहितीनुसार वाकी गावालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ पांडुरंग कुकडे यांचा जनावरांचा गोठा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या गोठ्यातील बकरीची 2 पिल्ले गायब असल्याचे कळले. तर दुसऱ्या दिवशी कुकडे यांना गायीच्या गोठ्यातच दोन बकऱ्या मृतावस्थेत आढळून आल्या. पुढे जाऊन बघितले असता वाघांच्या पाऊलखुणाही दिसून आल्या. एवढेच नव्हे तर या घटनेनंतर याच गावातील श्‍यामराव नाखरे जनावरे घेऊन घराकडे येत असताना वाटेतच एका वाघाने त्यांच्या नजरेसमोर बकरीच्या पिल्लाला वाघोबाने फस्त केले. गजानन चित्ते शेतात काम करीत असताना त्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकायला मिळाल्या. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत ते काम सोडून घराकडे धावत सुटले. येथील द्वारकामाई पार्कमध्ये सुरक्षारक्षकाचा जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या मुलालाही वाघाची डरकाळी ऐकू आल्याने तोही घाबरलेल्या अवस्थेत परत आला.

या घटनेमुळे संपूर्ण गावात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशाच पद्धतीची घटना केळवद परिसरातील जंगलालगत असलेल्या रायबासा या गावात घडली. येथील हिरामन देशमुख यांच्या शेतात देवा बेले यांची जनावरे होती. बुधवारी रात्री म्हशीचे रेडकू मारले. दुसऱ्या दिवशी वनविभागाचे पाहणी पथक आले असता त्यांच्या काही दूर अंतरावरच वाघाने भरदिवसा अकरा वाजता गायीच्या वासराची शिकार केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger entered in villeges in saoner taluka