अभयारण्यात आढळला वाघाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

पवनी (जि. भंडारा) : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चिचगाव बिटमध्ये आज, रविवारी सकाळी राजा ऊर्फ चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. त्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
आशिया खंडातील प्रसिद्ध जय या वाघाचा बछडा असलेला राजा ऊर्फ चार्जर हा उमरेड जंगलाच्या परिसरात वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी तो पवनी वनक्षेत्रात दाखल झाला होता. आज, रविवारी सकाळी अभयारण्यात सफारीसाठी गेलेल्या काही पर्यटकांना चिचगाव जंगलात कंपार्टमेंट नंबर 226 मध्ये हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. पर्यटकांनी या घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना दिली.

वन्यजीव विभागाने याबाबत गुप्तता ठेवून घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृत वाघ हा जयचा बछडा असलेला राजा ऊर्फ चार्जर असल्याचे स्पष्ट झाले. मृत वाघाचे पोट फुगल्यामुळे विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी राहुल गवई, सहायक वनसंरक्षक, परिक्षेत्र अधिकारी शेंडे यांच्या उपस्थितीत चार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने दुपारी अडीच वाजता घटनास्थळी शवविच्छेदनाला सुरुवात केली. डॉ. गुणवंत भडके, डॉ. भाग्यश्री राठोड, डॉ. विठ्ठल हटवार आणि पेंच येथील डॉ. चेतन पाथोडे यांच्या पथकाने पाच वाजेपर्यंत वाघाचे शवविच्छेदन केले. हा वाघ पाच ते सहा वर्षांचा नर असून त्याचे वजन 210 किलो होते. वाघाची लांबी 192 सेंटीमीटर आहे. शवविच्छेदनानंतर वाघाचा मृतदेह जाळून नष्ट करण्यात आला. डॉ. भडके यांनी प्राथमिक अंदाजानुसार वाघाच्या मृत्यूचे कारण विषबाधा असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे वन्यजीव विभागात खळबळ उडाली आहे.
पाच पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी
जय आणि राई यांचा बछडा असलेला राजा ऊर्फ चार्जरची आता पूर्ण वाढ झालेली होती. याच जंगलात राजापासून चांदी वाघिणीला पाच पिल्ले झाली आहेत. राजाचा मृत्यू झाल्यामुळे जंगलावर अधिकार करण्यास आलेल्या अन्य वाघांमुळे चांदीची पिल्ले संकटात येऊ शकतात, अशी माहिती वन्यप्रेमीने दिली आहे. त्यामुळे या पिलांचा जीव वाचविण्यासाठी वन्यजीव विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

Web Title: tiger found dead