सोशल मीडियावर व्याघ्र शिकारीचे निमंत्रण!

अभिजित लिखिते
मंगळवार, 16 मे 2017

प्राणिगणनेची माहिती होतेय सार्वजनिक; वन्यप्रेमींमध्ये संताप

प्राणिगणनेची माहिती होतेय सार्वजनिक; वन्यप्रेमींमध्ये संताप
अकोला - बुद्धपौर्णिमेच्या रात्री लुटुपुटूची प्राणिगणना पार पडली. राज्यभरातील व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यांमधील कोणत्या विभागामध्ये किती वन्यप्राणी आढळले याच्या आकडेवारीसह सविस्तर माहिती सध्या सोशल मीडियावर ओसंडून वाहत आहे. मात्र, या कृतीमुळे शिकाऱ्यांना विनासायास माहिती उपलब्ध होत असल्याने राज्यभरातील वाघांवर संकट ओढवले आहे. गणनेतील उत्साही नागरिकांनी टाकलेल्या या माहितीविरोधात वन्यप्रेमींमध्ये तीव्र संताप असून, ही घाई कशासाठी, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने 2008 पासून प्राणिगणनेसाठी "कॅमेरा ट्रॅप' आणि "ट्रान्झिट लाइन' या दोन तंत्रशुद्ध पद्धती अवलंबल्या आहेत. वन्यप्राण्यांबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी व सामान्य नागरिकांनीही वनसंपदेच्या संरक्षणासाठी समोर यावे, यासाठी मचाणावरील प्राणिगणना राज्यात कायम ठेवण्यात आली. मात्र, यातील आकडेवारी वनविभागाकडून ग्राह्य धरली जात नाही. या प्राणिगणनेला दिले गेलेले पर्यटनाचे स्वरूप आता धोकादायक ठरत आहे.

गणनेतील काही हौशींच्या अतिउत्साहामुळे सोशल मीडियावर माहिती आणि आकडेवारीला पाय फुटले आहेत. यामुळे राज्यातील वन्यजीव धोक्‍यात आले आहेत. व्हॉट्‌सऍपवर आदानप्रदान करताना ही माहिती फुटल्याचे सांगितले जात आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये प्रवेशासाठी परवानगी घ्यावी लागते. तिथे "टायगर सेल'सारख्या यंत्रणा कार्यरत असतानाही वाघांची शिकार झाल्याचे वास्तव आहे. याउलट परिस्थिती प्रादेशिक वनपरिक्षेत्रांची आहे. या वनपरिक्षेत्रांमध्ये जाण्यासाठी परवानगी लागत नाही. स्थानिकांना हाताशी धरून शिकारी सहज जाऊ शकतात. प्रादेशिक वनपरिक्षेत्राच्या संरक्षणासाठी उपाययोजना तोकड्या पडतात हा नेहमीचाच अनुभव आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वन्यजीवांची माहिती सहज उपलब्ध झाल्याने तिथे शिकारी टोळ्या हैदोस घालण्याची भीती वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.

सूरज पाल ऊर्फ चाचा हा राज्यात शिकार करणाऱ्या टोळीचा सूत्रधार होता. काही वर्षांपूर्वी त्याला दिल्लीत जेरबंद करून 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत वाघांच्या अधिवासाबाबत इत्थंभूत माहिती होती. तो शिकारीसाठी पैसा पुरवायचा. सरजू, रणजित, दलबीर हे स्थानिकांना हाताशी घेऊन शिकार केल्यावर व्याघ्रचर्माची तस्करी करायचे. मेळघाटमध्ये ममरू, चिका, मिराफल, लुकिस्तान, निनार आणि शिरी यांनी स्थानिकाच्या मदतीने वाघाची शिकार केली होती. सोशल मीडिया व संकेतस्थळावरील माहिती त्यांना उपयुक्त ठरल्याचे सांगितले जाते.

प्राणिगणनेची आकडेवारी ग्राह्य धरली जात नाही. मात्र, यातून बाहेर पडणारी माहिती निश्‍चितच धोकादायक आहे. परंपरेच्या नावावर सुरू असलेले "टुरिझम'तातडीने बंद करणे आवश्‍यक आहे. पुढील वर्षी ताडोबा येथील मचाणावरील गणना बंद करण्याचा प्रयत्न करू.
- किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ

Web Title: Tiger hunting invitation on social media!