मिहानमध्ये वाघ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेतली जात असल्याचेही हिंगणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे यांनी सांगितले.

नागपूर ः मिहान प्रकल्पातील आयटी कॅम्पसजवळ वाघाच्या पावलांचे ठसे दिसल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाघ की बिबट, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वन विभागाने त्या वन्यप्राण्याची ओळख पटविण्यासाठी पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावर 15 कॅमेरा लावले आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची त्या परिसरात दिवसरात्र गस्त आहे.

 

शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील हिंगणा, फेटरी, दहेगाव आणि वडगाव परिसरात गेल्या वर्षी वाघ दिसला होता. आता आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या मिहान प्रकल्पातही वाघ दिसल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. त्यामुळे वाघ आता शहराच्या वेशीवर आल्याचे अधोरेखित झाले आहे. मिहानमधील आयटी कंपनीचा सुरक्षा कर्मचारी शुक्रवारी रात्रीच्या वेळी कर्तव्यानंतर दुचाकीने घरी परतत होता. तेव्हा वाघ दिसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर लगेच वन विभागाला कळविण्यात आले.

 

कर्मचाऱ्यांनी केली कॅमेरा ट्रॅपची पाहणी

वन विभागाच्या सेमिनरी हिल्सचे कर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. गंगावने शनिवारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, वाघसदृश प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावर तीन कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. रविवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅपची पाहणी केली. दरम्यान, त्यात वाघाचे छायाचित्र आढळले नाही. मात्र, सकाळी पुन्हा वाघ दिसल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितल्याने आज पुन्हा त्या परिसरात 15 कॅमेरा लावण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गंगावने यांनी "सकाळ'ला सांगितले.

हिंगणा आणि सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वाघांचा मागोवा घेण्यासाठी गस्त वाढवली आहे. गस्त पथकाचे कर्मचारी मिहान परिसर व वाघांच्या पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावरील गावात जाऊन नागरिकांना जागरूक करीत आहेत. मात्र, अद्याप वाघ की बिबट याचे पुरावे सापडलेले नाहीत. तरीही नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेतली जात असल्याचेही हिंगणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे यांनी सांगितले.

 

बिबट आणि लांडग्यांचे अस्तित्व
मिहान परिसरातील इन्फोसिस कंपनीजवळ वन्यप्राण्यांचे ठसे आढळले आहेत. ते ठसे वाघाचे की बिबट्याचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कारण, ठसे भुसभुशीत जागेवर असल्याने पसरलेले आहेत. त्या परिसरात बिबट आणि लांडग्यांचे अस्तित्व आहे. त्यांची पावले भुसभुशीत मातीत पडल्यास ते पसरतात. त्यामुळे कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र आल्याशिवाय वाघ की इतर वन्यप्राणी हे सांगणे अवघड आहे. मात्र, वन विभागाकडून त्या परिसरातील गावकऱ्यांना घाबरू नका आणि परिसरात एकटे फिरू नका, असे आवाहन केले आहे.
-कुंदन हाते, मानद वन्यजीवरक्षक

शहराजवळ यापूर्वीही दिसला वाघ
हिंगणा - 2018
सहारा सिटी परिसरात दिसल्याची चर्चा ः डिसेंबर 2018
फेटरी - ऑगस्ट 2019
दहेगाव ः ऑगस्ट 2019


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger in Mihan?