Video : नागपूरच्या मिहानमध्ये वाघ फिरतोय... काळजी घ्या...

राजेश रामपूरकर 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे जाळे विणले जात असलेल्या मिहान-एससीझेड प्रकल्पात वाघाचा वावर पुन्हा दिसू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच फेटरी, दहेगाव, बोरगाव या परिसरात वाघ आला होता. त्यानंतर आता चक्क मिहान-सेझमध्येही वाघ असल्याचे वन विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

नागपूर : अग रात्री बाहेर जायचे का... नको गं बाई...बाबाचा फोन आला होता... मिहानमध्ये वाघ फिरतो आहे. रात्री उशिरापर्यंत फिरू नकोस... काळजी घे...असे सांगितले.. असा संवाद आज एमएडीसीच्या मध्यवर्ती सभागृहातील कॅन्टीनमध्ये ऐकायला मिळत होते. यावरून मिहानमधील कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांचे पालक आणि आप्त परिवार चिंतेत सापडले असल्याचे दिसून येते. असे असले तरी सुरक्षा गार्ड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर तेथील कर्मचारी विश्‍वास दाखवित आहे. आम्ही सुरक्षित आहोत, घाबरू नका असा धीरही ते आपल्या पालकांना देत आहेत. 

आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्यांचे जाळे विणले जात असलेल्या मिहान-एससीझेड प्रकल्पात वाघाचा वावर पुन्हा दिसू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच फेटरी, दहेगाव, बोरगाव या परिसरात वाघ आला होता. त्यानंतर आता चक्क मिहान-सेझमध्येही वाघ असल्याचे वन विभागाने शिक्कामोर्तब केले आहे.

तिन्ही मित्रांची भंबेरी  उडाली
एचसीएल कंपनीमध्ये कामगार असलेल्या बिहार येथील अफजल हुसेन आपल्या दोन मित्रांसह शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजतादरम्यान काम आटोपून घरी परतत होतो. इन्फोसिस मागील बाजूने वाघ अचानक रस्त्यावर आला. आम्हाला काही कळण्याच्या आतच त्याचे डोळे चमकले. यापूर्वी वाघाला फक्त प्राणिसंग्रहालय अथवा टीव्हीवरच पाहिले होते. प्रत्यक्ष वाघ दिसताच आम्हा तिन्ही मित्रांची भंबेरी  उडाली. वाघ रस्ता पार करून टीसीएसकडे जात होता, आमच्या आवाजाने तो मागे परतला. 

"भय्याजी भागो टायगर है'
ज्या भागातून आला तिकडेच परतला. आम्ही आमची दुचाकी वळवली व इन्फोसिसच्या सुरक्षारक्षकाला सतर्क करण्यासाठी "भय्याजी भागो टायगर है' असे ओरडलो. तसेच समोर असलेल्या दुसऱ्या कंपनीचा सुरक्षारक्षक तेथे आला. त्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांसह एमएडीसीचे अधिकारी घटनास्थळी आल्याने थोडा धीर आला. रात्री एक वाजता त्याच रस्त्याने घरी परतलो अशी आठवण तो सांगत होता. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याने अनुभवलेल्या क्षणाचा थरार झळकत होता. 

हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी घालत आहेत गस्त ​
या परिसरात वाघ आणि मानव यांच्यात संषर्घ होऊ नये म्हणून वन विभागाच्या सेमिनरी हिल्स आणि हिंगणा वनपरिक्षेत्रातील अधिकारी गस्त घालत आहेत. आजूबाजूच्या गावांसह मिहान परिसरातही वन विभागाने दर्शनी भागावर पोस्टर लावले असून जनजागृती करीत आहेत.

एकाही कॅमेरात वाघाचे छायाचित्र आले​ नाही 
रविवारी रात्री वाघांचे कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्र टिपले. मात्र, सोमवारी त्या परिसरात लावलेल्या 30 कॅमेऱ्यापैकी एकाही कॅमेरात वाघाचे छायाचित्र आलेले नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. गंगावणे यांनी सांगितले. मात्र, गस्त कायम आहे. यासाठी चमू तयार करण्यात आलेल्या आहेत. वाघाचा मागावा घेण्यात येत आहे. तसेच गस्तही वाढविण्यात आलेली आहे असे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ल यांनी कळविले आहे. 

या परिसरात सुरक्षा कर्मचारी असल्याने कधीच भीती वाटली नाही. मात्र, आज वाघ असल्याचे माहीत पडल्यावर धडकी भरली. भीतीही वाटायला लागली आहे. कारण दुपारी मुलगा एकटाच याच मार्गाने शाळा सुटल्यावर घरी जातो. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. मुलाला घरी नेण्यासाठी काम सोडून आलो आहे. 
- विनोद रामटेके, गावकरी सुखठाणा 

टॉर्च घेऊन गेलो 
शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरक्षारक्षकांसह शेकोटी लावून बसलो होतो. तेवढ्यात इन्फोसिसच्या मागील झुडपातून काही तरी आल्याचा भास झाला. वाघ असल्याची माहिती असल्याने दबकत दबकत सहकाऱ्यांसह भास झालेल्या ठिकाणाकडे टॉर्च घेऊन गेलो. तेव्हा वाघाचा पार्श्‍वभाग दिसला. 
- प्रवीण कोंबाडे, सुरक्षारक्षक 

कॅबचा वापर करा 
ताडोबामध्ये वाघ बघितला होता. आता मिहानच्या परिसरात वाघ असल्याचे कळल्यावर उत्सुकता वाढली त्यासोबतच भीतीही वाटायला लागली आहे. कंपनीनेही आम्हाला रात्रीच्या वेळेस बाहेर पडू नका अशा सूचना दिलेल्या आहेत. बाहेर जायचे असेल तर कंपनीच्या कॅबचा वापर करा. 
- कल्याणी बाविस्कर, प्रोग्रामर 

थोडी भीती वाटते 
वाघ असल्याचे ऐकल्यावर पहिल्यांदा अफवा वाटली. मात्र, वन विभागाचे कर्मचारी आणि आमच्या कंपनीने कळविल्यानंतर त्यावर विश्‍वास बसला. आता थोडी भीतीही वाटते. वाघासह सर्वांचीच सुरक्षा व्हावी एवढी इच्छा आहे. वाघाला पुन्हा त्याच्या अधिवासात पाठवणेच योग्य आहे. 
- सौभाग्य साहू, आयटी प्रोग्रामर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiger in mihan area of nagpur