सायंकाळी ‘पाच’च्या आत घरात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

वडेगाव - नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या मुरपार येथे वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाच्या दहशतीने गावकरी सायंकाळी पाच वाजताच्या आतच दरवाजा बंद करून राहत आहेत. सोमवारी रात्री गावात शिरलेल्या वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. घटनेने पुन्हा गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तिरोडा तालुक्‍यातील मुरपार, वडेगाव, चोरखमारा, कोडेलोहारा, कोयलारी, सर्रा, मोरेगाव, भजेपार, नांदलपार, लोणारा, नवेझरी, सितेपार, कुलपा ही गावे नागझिरा अभयारण्याला लागून आहेत. या अभयारण्यातील हिंस्र प्राणी नेहमी गावात शिरत असतात. दररोज त्यांचा धुमाकूळ राहत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी पाचच्या आतच घरात शिरते. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मुरपार येथील डॉ. श्‍यामराव फाये हे घरी गोठ्यात शेळ्या दावणीला बांधत होते. याच वेळी पट्टेदार वाघाने गोठ्याकडे मोर्चा वळविला व डॉ. फाये यांच्यावर झडप घातली. यात जखमी झालेल्या डॉ. फाये यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने गावकरी लाठ्याकाठ्यांसह धावले. त्यामुळे वाघ जंगलात पळून गेला. डॉ. फाये यांच्यावर सध्या तिरोडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरोडा वनविभागाचे पठाण, कानतोडे व ठवकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, भयभीत असलेल्या गावकऱ्यांनी वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली आहे.

शेकडो जनावरांचा फडशा 
अभयारण्यातील वाघ, बिबट्या हे प्राणी मुरपार, वडेगाव, चोरखमारा, कोडेलोहारा, कोयलारी, सर्रा, मोरेगाव, भजेपार, नांदलपार, लोणारा, नवेझरी, सितेपार, कुलपा आदी जंगलव्याप्त गावांत दररोज शिरतात. आतापर्यंत या प्राण्यांनी शेकडो जनावरांचा फडशा पाडला आहे. यात कोणाचे गाय, बैल तर, कोणाच्या शेळ्यांचा जीव गेला आहे. वन विभागाने याची दखल घेणे गरजेचे झाले आहे.

Web Title: tiger in murpar