वाघिणीला पाहून युवक बेशुद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

बुटीबोरी : नजीकच्या तारसी येथे एका युवकाला वाघीण दिसली. पळ काढल्याने वाघीणही मागे लागली. सुमारे दोन किमी अंतर कापून कसाबसा वर्धा मार्गावरील एका ढाब्याजवळ पोहोचताच युवक बेशुद्ध झाला. ही घटना रविवारी घडली. यामुळे परिसरात वाघाची दहशत परसरली आहे.

बुटीबोरी : नजीकच्या तारसी येथे एका युवकाला वाघीण दिसली. पळ काढल्याने वाघीणही मागे लागली. सुमारे दोन किमी अंतर कापून कसाबसा वर्धा मार्गावरील एका ढाब्याजवळ पोहोचताच युवक बेशुद्ध झाला. ही घटना रविवारी घडली. यामुळे परिसरात वाघाची दहशत परसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू राजेश द्विवेदी (वय 22) हा युवक ट्रॅक्‍टरने तारसी शिवारातील पांदण रस्त्याने शेतात जात असताना वाघाच्या पायाचे ठसे त्याला दिसले. खाली उतरून त्याने त्याचे मोबाईलवर फोटो काढले. आसपास वाघ असल्याचा शोध सोनू घेऊ लागला. अशातच वाघीण दोन बछड्यांसह दिसली. वाघ पाहताच त्याने पळ काढला. पळ काढणाऱ्या सोनूच्या मागे वाघीण लागली. जीवाच्या धाकाने पळ काढणारा सोनू तब्बल दोन कि. मी. वेगाने धावत होता. वर्धा मार्गावरील एका ढाब्यावर पोहोचल्यावर तो थांबला. मात्र, येथे काही सांगण्यापूर्वी तो बेशुद्ध झाला. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्याने आपबीती सांगितली.
त्याच्या ओळखीच्या व नातलगांना माहिती मिळाल्यावर सर्व ज्या ठिकाणी वाघ दिसला तेथे पोचले. येथे पुन्हा सोनू बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी बुटीबोरी येथील चौधरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सायंकाळी त्याला सुटी देण्यात आली. सोमवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाघिणीसोबत दोन बछडे असल्याचे सोनूने सांगितल्याने तिचा वावर फार दूर नसावा अशी माहिती वन विभागाच्या पथकाने दिली.
सोनूच्या भावालाही दिसला वाघ
सोनूच्या भावालाही 14 डिसेंबरला वाघीण दिसली होती. त्याने वन विभागाला माहिती दिली होती. त्यानंतर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, त्यात वाघीण आढळून आली नाही. सोनूने वाघीण दिसल्याचे सांगितल्याने या परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागानेही शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: tiger news butibori