अलीची बंदूक जप्तच केली नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा असलेली बंदूक ताब्यात घेण्यात आली नसल्याने अलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा वनविभागात आहे.

नागपूर : अवनीवर गोळी झाडणारा वादग्रस्त शिकारी असगर अली याची बंदूक अद्याप जप्त करण्यात आली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असे असताना या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा असलेली बंदूक ताब्यात घेण्यात आली नसल्याने अलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा वनविभागात आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या तीन सदस्यीय समितीने अलीकडे बंदुकीचा परवाना नसल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे तर अलीने तेलंगणाची निवडणूक पार पडेपर्यंत परवाना जमा करण्याची मुदत मागितली आहे. वडिलांची नेमणूक केली असताना अवनीची शिकार करणारा अली आणि याकरिता त्याने वापरलेली बंदूक हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आहे. इतका संवेदनशील पुरावा जप्त करण्यापासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कोण रोखत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पांढरकवडा येथील अवनी (टी-1) वाघिणीची शिकार केलेली बंदूक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे हस्तांतरित होणार नाही तोपर्यंत "बॅलेस्टिक' अहवाल देणे शक्‍य नसल्याचे पत्र वनविभागाला महिन्यापूर्वी पाठविले आहे. वन विभागाने प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी मृत वाघिणीच्या मांसपेशीसह 15 नमुने दिले होते. त्यातील 13 वस्तूंची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मासपेशींची तपासणी बंदुकीअभावी रखडली आहे. अहवालाची दिशा भरकटविण्यासाठी अद्यापही वन विभागाने बंदूक ताब्यात घेतलेली नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला अवनी वाघिणीचे नमुने प्रयोगशाळेला दिले होते. तेव्हाच बॅलेस्टिक चाचणीसाठी बंदुकीची गरज असल्याचे तोंडी सूचना देण्यात आली होती. प्रयोगशाळा व्यवस्थापनाने वन विभागाला बंदूक जमा करण्याचे पत्रही महिन्यापूर्वी पाठविले होते. बंदूक जमा केल्यानंतर दहा ते बारा दिवसांत अहवाल प्राप्त होण्याची शक्‍यता आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालात वाघिणीच्या मांसपेशीमध्ये काही प्रमाणात बेशुद्धीकरणाचे औषध आढळले असले तरी ते रक्तात आढळणे शक्‍य नसल्याचा दावा काहींनी केला आहे. त्यामुळे आता बॅलेस्टिक चाचणीच्या आधारावच पुढील चौकशीची दिशा निश्‍चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: tiger news yavatmal