चंद्रपूरमध्ये पट्टेदार वाघाची शिकार; 10 दिवसांत दुसरा बळी

टीम ई सकाळ
गुरुवार, 4 मे 2017

एकूण 10 दिवसात 2 पट्टेदार वाघांच्या मृत्यूने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली तालुक्यात पट्टेदार वाघाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सावली वनपरिक्षेत्रात असलेल्या पाथरी उपक्षेत्रातल्या पालेबारसा तलावाजवळ या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. 

निसर्गातील जीवसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या जंगलच्या राजाचे म्हणजेच वाघांचे रहिवास मानवी अतिक्रमणांमुळे धोक्यात येऊ लागले आहेत. वाघांची घटती संख्या लक्षात घेऊन सरकारकडून तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांकडून 'सेव्ह टायगर' अभियान राबविण्यात येते. 

सावली येथील ही वाघाची शिकार बुधवारी झाली असल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. रात्री उशिराने ही घटना उघडकीस आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली. तीन दिवसांपूर्वीच या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेल्या आठवड्यात नागभीड जवळ मांगली बीटमध्ये पट्टेदार वाघाला वीजेचा शॉक देऊन मारण्यात आलं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यावर प्राणीप्रेमींनी तीव्र खेद व्यक्त केला होता. त्यावर पुन्हा शिकारीची ही घटना समोर आली आहे. एकूण 10 दिवसात 2 पट्टेदार वाघांच्या मृत्यूने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
 

Web Title: tiger poached in chandrapur