नरभक्षक वाघाचा मोर्चा तिवस्याकडे

Tiger
Tiger

शेंदूरजनाबाजार (जि. अमरावती) - नरभक्षक वाघ आता धामणगाव तालुक्‍यातून तिवसा तालुक्‍यात शिरला आहे. बुधवारी (ता. २४) रात्री या वाघाने रघुनाथपूर येथे गायीला ठार केले. त्यामुळे वनविभागाने शेंदूरजनाबाजार, रघुनाथपूर, भांबोरा परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, अजूनपर्यंत वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही. 

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्‍यात धुमाकूळ घातल्यानंतर नरभक्षक वाघाने आपला मोर्चा आता तिवसा तालुक्‍यात वळविला आहे. बुधवारी या वाघाने रघुनाथपूर येथील प्रभाकर वानखडे यांची शेतातील गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. यामुळे परिसरात  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ सध्या भांबोरा- रघुनाथपूरनजीकच्या शिवारात असून वनाधिकाऱ्यांनी त्याला तिथेच पकडण्याची संपूर्ण तयारी सुरू केली आहे. वाघाला बघण्याकरिता भांबोरा व आजूबाजूच्या गावातील नागरिक गर्दी करून आरडाओरड करतात. त्यामुळे वाघाला जेरबंद करण्याच्या मोहिमेत अडचण येत आहे. वाघ लोकांवर हल्ला करू शकतो. त्यामुळे वाघ असलेल्या भागात बघ्यांनी गर्दी करू नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. या मोहिमेत वाघमोडे यांच्यासह सहायक वनरक्षक राजेंद्र बोंडे, अशोक कविटकर, एस. जी. भुयार आणि ६० ते ७० कर्मचारी आहेत.

वाघाच्या बंदोबस्तासाठी विविध पथके
अमरावती : जिल्ह्यात व्यक्तींवर हल्ले करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी उपवनसंरक्षक कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार वाघास बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी दिली आहे. त्यानुसार वाघाचा मागोवा घेण्यासाठी शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती  अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक एच. एस. वाघमोडे यांनी दिली.शासन निर्णयातील तरतुदीनुसार मनुष्यहानी प्रकरणात दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान संबंधित मृतांच्या वारसदारांना वाटप करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. प्रथम टप्प्यात तीन लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे, असे श्री. वाघमोडे यांनी सांगितले. वाघाच्या हालचालीवर व संनियंत्रणासाठी सामूहिक गस्त, कॅमेरा ट्रॅप इत्यादी उपाय अवलंबण्यात आले आहेत.

पालकमंत्र्यांकडून वनमंत्र्यांना पत्र 
अमरावती - जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील मंगरूळ दस्तगीरचे रहिवासी शेतकरी राजेंद्र निमकर यांना आणि अंजनसिंगी येथील शेतमजूर मोरेश्वर वाळके हे नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीखाली असून या वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कार्यवाहीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. त्याचप्रमाणे, हल्ल्यात बळी पडलेल्या  मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com